मराठा जागृती मेळावा १५ आॅक्टोबरला--मराठा महासंघाच्या बैठकीत निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 01:16 AM2017-10-05T01:16:54+5:302017-10-05T01:17:52+5:30
कोल्हापूर : महाराष्टÑातील खासदार, आमदारांचे मराठा समाजाकडे दुुर्लक्ष झाल्याकडे लक्ष वेधत
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : महाराष्टÑातील खासदार, आमदारांचे मराठा समाजाकडे दुुर्लक्ष झाल्याकडे लक्ष वेधत मराठा क्रांती मोर्चाच्या वर्षपूर्तीनिमित्त १५ आॅक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता कोल्हापुरात राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये मराठा जागृती मेळाव्याचे आयोजन करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या अखिल भारतीय मराठा महासंघाच्या बैठकीत घेण्यात आला. येथील राजर्षी शाहू स्मारक भवनच्या मिनी सभागृहात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे अध्यक्ष वसंतराव मुळीक हे होते.
कोल्हापुरात मराठा क्रांती मोर्चा निघून १५ आॅक्टोबर रोजी वर्ष पूर्ण होत आहे. या ऐतिहासिक मोर्चाची फलनिष्पत्ती काय? असा प्रश्न विचारला जात आहे, असे सांगून वसंतराव मुळीक म्हणाले, आता हाच प्रश्न घेऊन समाजासमोर जायचे आहे. मराठा भवन, मराठा समाजाची शैक्षणिक कर्जे माफ करा ह्या मागण्या आहेत. कोल्हापुरात मराठा भवन उभारण्याचा संकल्प आहे. भवनसाठी निधी संकलनाचे काम पारदर्शकपणे राबविण्यात येत आहे. प्रत्येकाने घराघरांत जाऊन ‘मराठा भवन’ ही संकल्पना मांडण्याची गरज आहे. १५ आॅक्टोबर रोजी मराठा जागृती मेळाव्यात सर्व संघटनांना निमंत्रित करण्यात येणार असल्याचेही मुळीक यांनी सांगितले.
प्रारंभी डॉ. संदीप पाटील यांनी, सर्व संघटनांना एकत्र आणावे व १५ आॅक्टोबरच्या मेळाव्याबाबत लोकप्रतिनिधींकडे जागर करावा, मराठा समाजाच्या मागण्यांसाठी प्रसंगी आमरण उपोषण करावे, असे सुचविले. यावेळी शैलेजा जाधव म्हणाल्या, संपूर्ण जिल्हाभर महिला मराठा ब्रिगेडच्या शाखा जास्तीत जास्त सुरू कराव्यात. विजय पाटील यांनी, मराठा समाजातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक कर्जे माफ करावीत, अशी मागणी केली. यावेळी सचिन पाटील, शैलेजा भोसले, निर्मला यादव, आदींनीही सूचना मांडल्या. याप्रसंगी शंकरराव शेळके, व्ही. के. पाटील, आदी उपस्थित होते.
‘मराठा भवन’साठी दबावगट करा
मराठा भवन उभारणीसाठी निधी संकलन होत असले तरीही एक दबावगट निर्माण केला पाहिजे. गरज पडल्यास आमरण उपोषण करण्याचा निर्णय घ्यावा, असे आवाहन वसंतराव मुळीक आणि डॉ. संदीप पाटील यांनी यावेळी केले.