‘मराठा भवन’ शासनच बांधून देणार
By admin | Published: December 30, 2014 12:13 AM2014-12-30T00:13:08+5:302014-12-30T00:15:33+5:30
राजेश क्षीरसागर यांची ग्वाही : मराठा दिनदर्शिकेचे थाटात प्रकाशन
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज व शाहू महाराज यांच्या संस्थानाच्या ठिकाणी मराठा समाजाचे भवन नाही, ही शोकांतिका आहे. कोल्हापुरातील मराठा भवन जागेचा प्रश्न मार्गी लागला असून, बांधकामाची जबाबदारी आमची आहे. त्यासाठी शासनाकडून निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली.
मराठा महासंघाच्या दिनदर्शिका प्रकाशन समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डी. बी. पाटील होते. आमदार क्षीरसागर म्हणाले, मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबाबत युतीचे सरकार सकारात्मक आहे. १६ ऐवजी २० टक्के आरक्षणासाठी आमचे प्रयत्न सुरू असून, ते मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. गंभीर आजारांचा उपचार मोफत करणार असून, औषधाचा खर्चही संबंधितांना करू देणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
आमदार डॉ. सुजित मिणचेकर म्हणाले, मराठा समाज आरक्षणाच्या आंदोलनात पहिल्यांदा उतरणारा मी पहिला दलित आमदार असून, हा सर्व शाहू महाराजांच्या विचारांचा प्रभाव आहे. कोणत्याही समाजाचा स्तर उंचावण्यासाठी सांघिक प्रयत्नांची गरज आहे.
मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी प्रास्ताविकात दिनदर्शिका काढण्यामागचा हेतू स्पष्ट केला. मराठा आरक्षणासाठी शांत डोक्याने लढा दिला, त्याला यशही आले. केवळ आरक्षणाच्या कामावर न थांबता मराठा समाजाला अनिष्ट रूढी, परंपरेतून बाहेर काढण्याचे काम करावे लागणार आहे. समाज विज्ञाननिष्ठ झाला तरच प्रगती करू शकतो, याची जाणीव-जागृती करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी डी. जी. पाटील, प्रताप साळोखे, उद्योजक चंद्रकांत जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. व्ही. बी. पाटील, बबनराव रानगे, मोहन कुशिरे, राजू मेवेकरी, दीपाली पाटील, संयोगीता पाटील उपस्थित होते. शैलजा भोसले यांनी आभार मानले.
‘मराठा भवन’ला
भरभरून मदत
मराठा स्वराज्य भवन बांधकामासाठी कार्यक्रमस्थळी संजय वाईकर यांनी ११, तर सीमा पाटील यांनी २१ हजार रुपये मदत दिली. कार्यक्रम संपेपर्यंत २ लाख ८७ हजार रुपयांची मदत गोळा झाल्याचे संयोजकांनी जाहीर केले.