मराठ्यांच्या राजधानीत क्रांती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2016 12:48 AM2016-10-04T00:48:21+5:302016-10-04T00:57:07+5:30

साताऱ्यात ३५ लाखांचा महासागर; मूक मोर्चाला सहा किलोमीटरची रांग

Maratha capital revolution! | मराठ्यांच्या राजधानीत क्रांती!

मराठ्यांच्या राजधानीत क्रांती!

googlenewsNext

सातारा : तब्बल सहा किलोमीटर लांबीचा सर्वांत लांब असा महामोर्चा काढून सातारा हीच खऱ्या अर्थानं मराठ्यांची राजधानी असल्याचा प्रत्यय पस्तीस लाखांपेक्षाही जास्त समाजबांधवांनी सोमवारी आणून दिला. या महामोर्चामुळे पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक सलग सात तास पूर्णपणे ठप्प झाली, तर महामोर्चातील शेवटचा मावळा शहरापासून तब्बल सहा किलोमीटर लांब असलेल्या शेंद्रे गावातच थांबला होता. सायंकाळी सहा वाजेपर्यंत वाहतूक सुरळीत करण्यातच पोलिसांची ताकद पणाला लागली.
सोमवारी पहाटेपासूनच साताऱ्याचे सर्व रस्ते वाहनांनी हाऊसफुल्ल झाले होते. सकाळच्या प्रहरातच शाहू स्टेडियम, झेडपी मैदान अन् सैनिक स्कूल ग्राउंड मराठा समाज बांधवांच्या गर्दीने फुलून गेले होते. या ठिकाणी सर्वाधिक संख्या माता-भगिनींचीच होती. लहान मुलांसह वयोवृद्धांपर्यंत यात सहभागी झाले होते. गेले चार दिवस जिल्ह्यात तुफान पाऊस सुरू असल्याने सोमवारी अनेकांनी रेनकोट अन् छत्री सोबत आणली होती; मात्र ढगाळलेल्या आभाळानं या महामोर्चाचाही जणू आदर केला. महामोर्चा संपेपर्यंत एक थेंबही पाऊस साताऱ्यात पडला नाही.
सकाळी ११ वाजून २५ मिनिटांनी ‘राजमाता जिजाऊवंदना’ झाल्यानंतर महिलांपासून महामोर्चास सुरुवात झाली. मात्र, शाहू स्टेडियमजवळ आल्यानंतर या ठिकाणी पूर्वीच उपस्थित असलेल्या पुरुषांच्या जमावाने स्वत:हून या माता-भगिनींना वाट करून दिली. त्यानंतर राधिका चौक, राजवाडा अन् कमानी हौद मार्गे हा महामोर्चा पोवई नाका येथे विसावला. यावेळी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.
या ठिकाणी मराठा तरुणींनी आपल्या भाषणातून वेदनांचा हुंकार प्रकट केला. त्यानंतर कोपर्डी, आरक्षण अन् अ‍ॅॅट्रॉसिटी यासह अनेक मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. अश्विन मुदगल यांच्या कार्यालयात जाऊन देण्यात आले. यावेळी सर्व राजकीय पक्षांचे नेते पोवई नाका येथेच थांबले होते.


सर्वच पक्षांचे नेते उपस्थित
महामोर्चाचे नेतृत्व सर्वसामान्य माता-भगिनींनी केले असले तरी राजकीय पक्षांचे नेते वेगवेगळ्या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवीत होते.
पोवई नाक्याजवळील एका इमारतीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार जयकुमार गोरे, आमदार आनंदराव पाटील यांच्यासह
काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते.
तर याच चौकानजीक असलेल्या जिल्हा बँकेच्या इमारतीत खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, माजी मंत्री व आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, आमदार प्रभाकर घार्गे, आमदार दीपक चव्हाण, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, सुरेंद्र गुदगे आणि सत्यजित पाटणकर यांच्यासह राष्ट्रवादीचे इतर नेते उपस्थित होते.
जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे हेही दिवसभर तळ ठोकून होते. राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हेही सपत्नीक या महामोर्चास्थळी उपस्थित होते.


कोपर्डीतील पीडित मुलीचे पालकही महामोर्चात
साताऱ्यातील महामोर्चात सहभागी होण्यासाठी नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील पीडित मुलीचे नातेवाईक रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास साताऱ्यात दाखल झाले. सायंकाळी सहा वाजता ते कोपर्डीकडे रवाना झाले.
दारातही मराठा क्रांती रांगोळी
मराठा क्रांती महामोर्चा ज्या मार्गाने निघणार होता, त्या मार्गावर अनेक घरांसमोर महामोर्चाला पाठिंबा दर्शविणाऱ्या रांगोळी रेखाटण्यात आल्या होत्या. महामोर्चाच्या मार्गावर जाणाऱ्या बहुतांश मावळ्यांना या रांगोळी आपल्या मोबाईलमध्ये टिपण्याचा मोह आवरता आला नाही


महामोर्चा सुरू असताना एका अत्यवस्थ रुग्णाला घेऊन एक रुग्णवाहिका चौकात आली. त्यावेळी सर्व स्वयंसेवकांनी तत्काळ रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून दिला. ही शिस्त, माणुसकी अन् संयम पाहून तमाम सातारकर भारावून गेले. लाखोंच्या संख्येने निघालेल्या या महामोर्चात शेवटपर्यंत ‘पिन ड्रॉप सायलेन्स’ होता.
तब्बल चार हजार स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे केलेले कार्य पोलिस खात्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरले. सातारा जिल्ह्यातील अकरा तालुक्यांमधून आलेल्या समाज बांधवांसोबत सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे आणि मुंबई येथीलही मंडळींची या महामोर्चास साथ मिळाली.

छत्रपतींचा वारसा लाभलेल्या साताऱ्यात महामोर्चाच्या निमित्ताने सकल मराठा समाजाच्या एकीचे विराट दर्शन घडले. सोमवारी निघालेल्या या महामोर्चाने आजवरच्या गर्दीचे सर्व विक्रम मोडीत काढले. मोर्चाच्यावतीने मराठा युवतींनी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांना मागण्यांचे निवेदन दिले. - आणखी वृत्त/ पान २, ३, हॅलो १, २, ३ व ४

Web Title: Maratha capital revolution!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.