मराठ्यांना शासन घाबरले, सरकार अन् राज्यपालांच्याविरोधात कोल्हापुरात मराठा समाजाची घोषणाबाजी
By संदीप आडनाईक | Published: December 18, 2023 05:53 PM2023-12-18T17:53:10+5:302023-12-18T17:54:54+5:30
कोल्हापूर : राज्यपाल दौरा अचानक रद्द केल्याने सकल मराठा समाजाच्या नेत्यांनी सोमवारी "मराठ्यांना शासन घाबरले" असे घोषवाक्याचे फलक हातात ...
कोल्हापूर : राज्यपाल दौरा अचानक रद्द केल्याने सकल मराठा समाजाच्या नेत्यांनी सोमवारी "मराठ्यांना शासन घाबरले" असे घोषवाक्याचे फलक हातात धरुन राज्य सरकार आणि राज्यपालांच्या विरोधात दसरा चौकात जोरदार घोषणाबाजी केली.
ऐतिहासिक दसरा चौकात सकल मराठा समाजाचे सुरू असलेले धरणे आंदोलन स्थळी सोमवारी मोठ्या संख्येने सरनोबतवाडी येथील ग्रामस्थ, वकील भगिनी आणि मूक-कर्णबक्षिर असोसिएशनच्या सदस्यांनी उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. यावेळी सरनोबतवाडीच्या सरपंच शुभांगी आडसूळ, वैशाली माळी, योगीता आडसूळ तसेच वकील भगिनी कल्पना माने, हेमा काटकर, अश्विनी भोसले, कल्पना पाटील, स्वाती तानवडे, संपदा माने, अपर्णा कदम, ओंकार पाटील, अनिसा शेख यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला.
सकाळी मराठा समाजाने दसरा चौकात साखळी धरणे आंदोलन केले. यावेळी राज्यपालांनी अचानक दौरा रद्द केल्यामुळे मराठ्यांना शासन घाबरले अशा आशयाच्या घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. छगन भुजबळ आणि राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. यावेळी वसंतराव मुळीक, ॲड. बाबा इंदुलकर, बाबा पार्टे, प्रा. अनिल घाटगे, सुनिता पाटील, शैलजा भोसले यांनी भाषणे केली.
भिवंडी-ठाणे येथील ओबीसी निर्धार मेळाव्यात रविवारी ओबीसी विरोधात बोलणाऱ्यांचा निवडणूकीत कार्यक्रम करावा असे भुजबळ पुन्हा बाेलल्यामुळे मराठा समाजामध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. अनुचित घडू नये म्हणून राज्यपालांचा दौरा रद्द केला. याचाच अर्थ मराठा समाजाला घाबरुन सरकारने हा निर्णय घेतला असे ते म्हणाले. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण हवे आहे, परंतु इतर जातीचे आरक्षण हिसकावून घेवून, किंवा इतर जातींवर अन्याय करुन, आरक्षण मिळाले पाहिजे अशी मागणी नसल्याचे यावेळी सांगण्यात आले.
मराठ्यांना आरक्षण हे ओबीसी प्रवर्गातूनच पाहिजे, परंतु इतर जातीचे आरक्षण हिसकावून घेवून, किंवा इतर जातींवर अन्याय करून, मराठा आरक्षण मिळाले पाहिजे अशी मागणी नाही. मूक-कर्णबक्षिर असोसिएशन, कोल्हापूर चे अध्यक्ष उद्भव पन्हाळकर, सचिव अभय गवळी, गौरव शेलार, विनोद चव्हाण, संजय चव्हाण, किरण सुर्यवंशी, योगेश जाधव, जयश्री गवळी, अमेय गायकवाड, आर्या फळसळकर, अतुल फणसळकर इ. उपस्थित होते.