मराठा समाजाची २६ ला मंत्रालयावर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 12:46 AM2018-11-15T00:46:46+5:302018-11-15T00:46:54+5:30
कोल्हापूर : राज्य सरकारने केवळ आश्वासने देऊन मराठा समाजाची फसवणूक केली आहे. आमचा संयम संपला असून, सकल मराठा समाजाच्या ...
कोल्हापूर : राज्य सरकारने केवळ आश्वासने देऊन मराठा समाजाची फसवणूक केली आहे. आमचा संयम संपला असून, सकल मराठा समाजाच्या वतीने २६ नोव्हेंबरला हजारो चारचाकी वाहने घेऊन मंत्रालयावर धडक देणार आहोत. आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून हलणार नाही, अशी माहिती सकल मराठा समाज कृती समितीचे निमंत्रक वसंतराव मुळीक यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. आता सरकारचे दिवस भरले असून, अजून जास्त काळ ते समाजाला फसवू शकत नाही. देवेंद्र फडणवीस, एक तर आरक्षण द्या; अन्यथा चालते व्हा, असा इशाराही त्यांनी दिला.
मुळीक म्हणाले, मागासवर्गीय समिती न्यायालयात अहवाल सादर करणार असताना तत्पूर्वी प्रसारमाध्यमांतून समितीचा अहवाल फुटतोच कसा? सरकारच्या हेतूविषयी आम्हाला शंका येत आहे. दसरा चौकातून निघणाऱ्या मोर्चात राज्यातून हजारो गाड्या सहभागी होणार असल्याने मुंबईची कोंडी होईल.
दिलीप देसाई म्हणाले, समाजाच्या २२ मागण्या मान्य असल्याचे पत्र पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले; पण पुढे काहीच झाले नाही. ‘सारथी’ व ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळा’ला निधी दिल्याचा डांगोरा पिटला; पण किती तरुणांना लाभ झाला?
इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत म्हणाले, मराठा आणि कुणबी यांमध्ये फूट पाडून आरक्षणाचा बट्ट्याबोळ करण्याचे सरकारचे षड्यंत्र आहे. हिवाळी अधिवेशनाचे कामकाज पाचच दिवस चालणार आहे. तेथे अजेंड्यावर आरक्षणाचा विषय नसल्याने सरकारची नियत चांगली दिसत नाही. यावेळी गुलाबराव घोरपडे, स्वप्निल पार्टे, इंद्रजित माने, आकाश पाटील, शरद साळुंखे, दिलीप सावंत उपस्थित होते.
शाहू छत्रपती करणार नेतृत्व
दसरा चौकातून २६ नोव्हेंबरला निघणाºया मोर्चाचे नेतृत्व शाहू छत्रपती करणार आहेत. त्यांच्यासह ‘नाबार्ड’चे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्यासह खासदार, आमदार यामध्ये सहभागी होणार असल्याचे मुळीक यांनी सांगितले.
मराठ्यांचा संयम बघितला; आता ‘क्रांती’
सरकारने मराठा समाजाची चेष्टा केली. आतापर्यंत आमचा संयम बघितला. आता ‘क्रांती’ या शब्दाची ताकद दाखवू. भले आम्हाला नक्षलवादी ठरवा; आम्ही घरावर तुळशीपत्रे ठेवूनच रिंगणात उतरलो आहोत. आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नसल्याचा इशारा इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी दिला.
...तर पोस्टर फाडू
मागासवर्गीय समितीचा अहवाल सादर केल्यानंतर भाजपच्या वतीने श्रेयवादाची पोस्टरबाजी सुरू होईल; पण टिकाऊ आरक्षण दिल्याशिवाय अशी पोस्टरबाजी केली तर ते पोस्टर फाडू, असा इशारा दिलीप देसाई यांनी दिला.