मराठा-दलित ऐक्य परिषदेस लाखाहून अधिक लोक अपेक्षित : उत्तम कांबळे
By admin | Published: November 8, 2016 01:14 AM2016-11-08T01:14:27+5:302016-11-08T01:27:30+5:30
परिषदेमुळे होणार सामाजिक अभिसरण : शहाजी कांबळे
कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए)ची पूर्वीपासूनच मागणी आहे; परंतु पुरोगामी महाराष्ट्रात विविध जातिसमुदायांमध्ये सलोखा कमी होऊन जातीजातींत दरी निर्माण झाली आहे. ती कमी करण्यासाठी शुक्रवारी (दि. ११) कोल्हापुरात मराठा-दलित ऐक्य परिषद आयोजित केली आहे. या परिषदेला एक लाखाहून अधिक लोक उपस्थित राहतील, असा विश्वास जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी शनिवारी व्यक्त केला.
ताराबाई पार्क येथील सासने मैदान येथे शुक्रवारी दुपारी दोन वाजता ही परिषद घेण्यात येणार आहे. तिच्या तयारीसाठी अक्षता मंगल कार्यालय येथे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
उत्तम कांबळे म्हणाले, महाराष्ट्राच्या समाजजीवनात मराठा, दलित, ओबीसी, आदिवासी तसेच इतर जातिधर्मांतील लोकांनी एकदिलाने राहावे व जातिजातींत निर्माण झालेली दरी व तेढ कमी होऊन बंधुभाव व सलोखा निर्माण व्हावा, यासाठी ही परिषद घेण्यात येत आहे.
परिषदेच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले असणार आहेत. परिषदेचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते होणार आहे. स्वागताध्यक्ष जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे असणार आहेत. मार्गदर्शक म्हणून माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील, ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, ‘शिवसंग्राम’चे अध्यक्ष विनायक मेटे, कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार राजू शेट्टी, खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार धनंजय महाडिक, खासदार संजयकाका पाटील, माजी आमदार श्रीपतराव शिंदे, मनसेचे बाळा नांदगावकर, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, आमदार सर्वश्री. हसन मुश्रीफ, सतेज पाटील, राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, सुजित मिणचेकर, प्रकाश आबिटकर, सत्यजित पाटील, संध्यादेवी कुपेकर, माजी आमदार संपतराव पवार-पाटील, वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य अच्युत माने, डॉ. कृष्णा किरवले, आदी मार्गदर्शन करणार आहेत.
बैठकीला राज्य सचिव मंगलराव माळगे, शामप्रसाद कांबळे, बी. के. कांबळे, डॉ. अनिल माने, दत्ता मिसाळ, बाळासाहेब वाशीकर, आदी उपस्थित होते.
परिषदेमुळे होणार सामाजिक अभिसरण : शहाजी कांबळे