Maratha Kranti Morcha भावांनो... हिंसक मार्गाने आंदोलन नको, मराठा समाजातील नेत्यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 05:59 PM2018-07-25T17:59:39+5:302018-07-25T18:36:19+5:30

हिंसक आंदोलनाच्या माध्यमातूनही ध्येयापर्यंत पोहोचता येणार नाही. आरक्षणाची मागणी व्यवहार्य असली तरी त्यासाठी कुणी हिंसक लढ्यासाठी भरीस घालत असेल तर सावध राहायला हवे. सरकारवर दबाव वाढवतानाच न्यायालयीन पातळीवर अधिक नियोजनबद्ध रीतीने लढण्याची गरज आहे, असे भावनिक आवाहन मराठा समाजातील जाणत्या नेत्यांनी केले आहे.

Maratha Kranti Morcha Bhawan ... do not stir in a violent way, appeal to Maratha community leaders | Maratha Kranti Morcha भावांनो... हिंसक मार्गाने आंदोलन नको, मराठा समाजातील नेत्यांचे आवाहन

Maratha Kranti Morcha भावांनो... हिंसक मार्गाने आंदोलन नको, मराठा समाजातील नेत्यांचे आवाहन

Next
ठळक मुद्देभावांनो... हिंसक मार्गाने आंदोलन नको, नियोजनबद्ध रीतीने सारे लढूया मराठा समाजातील जाणत्या नेत्यांनी केले आवाहन

कोल्हापूर : हिंसक आंदोलनाच्या माध्यमातूनही ध्येयापर्यंत पोहोचता येणार नाही. आरक्षणाची मागणी व्यवहार्य असली तरी त्यासाठी कुणी हिंसक लढ्यासाठी भरीस घालत असेल तर सावध राहायला हवे. सरकारवर दबाव वाढवतानाच न्यायालयीन पातळीवर अधिक नियोजनबद्ध रीतीने लढण्याची गरज आहे, असे भावनिक आवाहन मराठा समाजातील जाणत्या नेत्यांनी केले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात आरक्षणाच्या मागणीसाठी काकासाहेब शिंदे या तरुणाने जलसमाधी घेतली. बुधवारीही दिवसभर या आंदोलनाचे हिंसक पडसाद राज्याच्या अनेक भागांत उमटले. ते पाहून हा आंदोलनाचा मार्ग नाही, माझ्या प्रिय मराठा भावांनो आणि बहिणींनो, या हिंसक मार्गाने जाऊ नका, असे भावनिक आवाहन या नेत्यांनी केले आहे.

त्यासंबंधीची भावना ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील, उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश बी. एन. देशमुख, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे, कष्टकरी चळवळीचे नेते डॉ. भारत पाटणकर, बीव्हीजी ग्रुपचे अध्यक्ष हनुमंत गायकवाड, ज्येष्ठ कवी डॉ. विठ्ठल वाघ, ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे, ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे, ज्ञानेश महाराव, माजी कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे, अभ्यासक व वक्ते श्रीमंत कोकाटे, कथाकार आणि नाटककार जयंत पवार, अभिनेते सयाजी शिंदे, पत्रकार व साहित्यिक विजय चोरमारे, प्रकल्पग्रस्तांचे नेते संपत देसाई, नाटककार, दिग्दर्शक संतोष पवार आणि सामाजिक कार्यकर्त्या मेघा पानसरे यांनी निवेदनाद्वारे हे आवाहन केले आहे.

त्यात म्हटले आहे,‘मराठा समाजाने सनदशीर मार्गाने केलेल्या शक्तिप्रदर्शनाची सरकारने योग्य दखल घेतली नाही. मराठा समाजाच्या भावना समजून घेण्यात सरकार कमी पडले; त्यामुळेच आंदोलनाला आजचे आक्रमक स्वरूप प्राप्त झाले आहे. हिंसक आंदोलनांमुळे वातावरण तापले तरी त्यातून शेवटी हाती काहीच लागत नाही. भावनिक मुद्द्यावरील आंदोलन मोठ्या उंचीवर पोहोचल्यासारखे वाटले तरी ते दीर्घकाळ टिकत नाही.

मराठा समाजाने आपल्या मागण्यांसाठी सरकारशी संघर्ष करायलाच हवा; परंतु त्यासाठी सनदशीर मार्गाने लढा द्यायला हवा. अ‍ॅट्रॉसिटीचा मुद्दा काढून मराठा-दलितांमध्ये, तसेच आरक्षणाच्या निमित्ताने मराठा-ओबीसींमध्ये तेढ वाढविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्यापासून सावध राहिले पाहिजे; नाही तर महाराष्ट्राचे सामाजिक स्वास्थ्य बिघडविल्याचे पातक मराठा समाजाच्या माथी येईल.

‘मराठा समाज हा महाराष्ट्रातील एक प्रमुख कर्ता आणि वडीलधारा समाज आहे; त्यामुळे समाजातील इतर घटकांप्रती त्याची जबाबदारीही मोठी आहे. विविध कारणांसह सरकारी धोरणांमुळे शेती उद्ध्वस्त झाली. त्याचा फटका प्रामुख्याने मराठा समाजाला बसला. अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, शेकडो कुटुंबे उघड्यावर आली.

आर्थिक विपन्नावस्थेत ढकलल्या गेलेल्या मराठा समाजाला बाहेर काढण्यासाठी सरकारने मदतीचा हात दिलाच पाहिजे. त्यासाठी आरक्षणाची लढाई लढली पाहिजे असे कुणाला वाटत असेल तर त्यात चुकीचे नाही. मराठा समाजाच्या तरुणांमध्ये प्रचंड ऊर्जा आहे आणि त्या ऊर्जेचा वापर रचनात्मक कामासाठी व्हायला हवा. आपण कर्ते आहोत, तर आपली ऊर्जा व्यवस्था बदलण्यासाठी वापरायला हवी. आरक्षण गरजेचे वाटत असले तरी आपल्या दुखण्यांवर तेवढाच एक इलाज आहे, असे मानण्याचे कारण नाही.’

... तर ध्येयापर्यंत कसे पोहोचणार?

जलसमाधी, आत्मदहन यांसारखे मार्ग अवलंबून आपल्याला ही लढाई अखेरपर्यंत नेता येणार नाही आणि हिंसक आंदोलनाच्या माध्यमातूनही ध्येयापर्यंत पोहोचता येणार नाही. नेतृत्वहीन आणि दिशाहीन आंदोलन चालवून काहीच पदरात पडणार नाही. आंदोलनाला हिंसक वळण लागले तर तो कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न बनतो आणि मग सरकारचे काम सोपे होते, हे लक्षात घ्यायला हवे.

Web Title: Maratha Kranti Morcha Bhawan ... do not stir in a violent way, appeal to Maratha community leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.