Maratha Kranti Morcha : मराठा आरक्षणासाठी खास आधिवेशन घेण्याची मागणी, कोल्हापुरात ठिय्या आंदोलनाचा तिसरा दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 06:23 PM2018-07-26T18:23:01+5:302018-07-26T18:26:24+5:30
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी आरक्षणाचा आदेश देऊन गुरुवारी सुमारे ११७ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सकल मराठा समाजाच्या वतीने ऐतिहासिक दसरा चौकात मानवी साखळी निर्माण करण्यात आली. यामध्ये मोठ्या संख्येने विविध संघटनांचे नेते, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
कोल्हापूर : मराठा आरक्षणासंदर्भात दोन वर्षे शांततेत निर्णयाची वाट पाहिली. आता समाज संतापला, उद्रेक होतो आहे. सरकारने संभ्रमावस्था दूर करून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी खास अधिवेशन बोलावण्याची मागणी लोकप्रतिनिधी व विविध संघटनांनी केली.
मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, या मागणीसाठी दसरा चौक येथे सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गेले तीन दिवस बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात ही मागणी करण्यात आली. यावेळी विविध पक्ष, संघटनांनी पाठिंबा व्यक्त करीत आंदोलनात सहभाग नोंदविला.
दरम्यान, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी आरक्षणाचा आदेश देऊन गुरुवारी सुमारे ११७ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सकल मराठा समाजाच्या वतीने ऐतिहासिक दसरा चौकात मानवी साखळी निर्माण करण्यात आली. यामध्ये मोठ्या संख्येने विविध संघटनांचे नेते, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
धरणे आंदोलनाच्या स्थळी भेट देऊन महापौर शोभा बोंद्रे, उपमहापौर महेश सावंत, आमदार चंद्रदीप नरके, आमदार सत्यजित पाटील, कॉँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजू लाटकर, माजी महापौर आर. के. पोवार, आदी नेत्यांनी भाषणात, आता मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटायचे नाही, अशी जणू शपथच घेतली. यावेळी जय भवानी - जय शिवाजी, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, आदी घोषणा देण्यात आल्या. धरणे आंदोलनस्थळी महे गावचे शाहीर रंगराव पाटील यांनी, ‘भाजप सरकारला घेरायचं हाय, आता काही मागं सरायचं नाय,’ असा मराठा आरक्षणाबाबत पोवाडा सादर केला.
ठिय्या आंदोलनस्थळी शुक्रवारी आंदोलनाच्या चौथ्या दिवशी सरकारच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने दसरा चौकात श्राद्ध घालण्यात येणार असून, काही कार्यकर्ते डोक्याचे मुंडणही करणार आहेत.
जिल्ह्यात ठिकठिकाणी बंद
दरम्यान, या प्रश्नासाठी कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी बंद पाळण्यात आला. यामध्ये कागल तालुक्यातील मुरगूडमध्ये सर्वपक्षीय निषेध मोर्चा काढत मुरगूड-राधानगरी महामार्ग काही काळ रोखून धरला; तर सेनापती कापशी येथे कडकडीत बंद पाळण्यात आला; तसेच टायर पेटवून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. याशिवाय चंदगड आणि धामोड (ता. राधानगरी) येथेही बंद पाळण्यात आला.