मराठा लेकीबाळींच्या भावनांचा हुंकार!

By admin | Published: September 26, 2016 11:34 PM2016-09-26T23:34:45+5:302016-09-26T23:41:32+5:30

स्क्रिप्ट टेस्टसाठी ३० जणी : महाविद्यालयीन युवतींसह शालेय विद्यार्थिनींनी केल्या भावना व्यक्त; बारामतीच्याही तरुणींचा सहभाग

Maratha leechibali sentiment hunker! | मराठा लेकीबाळींच्या भावनांचा हुंकार!

मराठा लेकीबाळींच्या भावनांचा हुंकार!

Next

सातारा : सातारा महामोर्चात आपल्याला व्यक्त होता व्हावं, यासाठी जिल्ह्यातील युवती व शालेय मुली किती उत्सुक आहेत, हे सोमवारी झालेल्या ‘स्क्रिप्ट टेस्ट’मध्ये स्पष्ट झालं. तब्बल ३० मुलींनी मराठा महामोर्चाच्या कार्यालयात आपले मनोगत व्यक्त करून उपस्थितांना प्रभावित केले. युवती व शालेय मुलींच्या मनात असणाऱ्या उद्विग्न भावनांचा सशब्द हुंकार यानिमित्ताने पाहायला मिळाला.
राजधानी साताऱ्यात होणाऱ्या महामोर्चामध्ये मराठा समाजाचा संताप मूकपणे व्यक्त केला जाणार आहे. या समाजाच्या पाच मुली छत्रपती शिवरायांच्या पोवई नाक्यावरील पुतळ्याजवळ मोर्चेकऱ्यांसमोर आपली भावना व्यक्त करणार आहेत.
या टेस्टसाठी सुरुवातीला कार्यालयात नावनोंदणी झाली. परीक्षकांनी एकेका मुलीला बोलण्याची संधी दिली. या मोर्चाच्या अनुषंगाने आपल्या तीव्र भावना या मुलींनी मोजक्या पण प्रभावी शब्दांत मांडल्या.
सातारा येथील मराठा क्रांती महामोर्चा आदर्शवत असाच झाला पाहिजे, यासाठी सकल मराठा समाजबांधव झटून काम करत आहे. सहयोग निधी संकलनाचा निर्णय रद्द करून, एक अनोखा सामाजिक पायंडा पाडला आहे. सातारा ही मराठ्यांची राजधानी आहे. राज्यात आजवर निघालेल्या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आंदोलनकर्त्यांचे सर्व विक्रम साताऱ्याचा महामोर्चा मोडणार आहे. त्यामुळे याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.
महामोर्चामध्ये आबालवृद्ध सहभागी होणार असून, कोणी पुढे, मागे, मध्यभागी असायचे याचेही नियोजन झाले आहे. (प्रतिनिधी)

बारामतीकर तरुणी साताऱ्यात

मूळच्या बारामतीच्या पण शिक्षणानिमित्त कऱ्हाडात आलेल्या काही युवती स्क्रिप्ट टेस्टसाठी मराठा महामोर्चाच्या कार्यालयात आल्या होत्या. त्यांना आलेले अनुभव त्यांनी प्रभावीपणे मांडले.
प्रत्येक तालुक्याला वाव
जिल्ह्यामध्ये ११ तालुके आहेत. या प्रत्येक तालुक्याला प्रतिनिधीत्व मिळावं, यासाठी प्रशिक्षक काटेकोरपणे विचार करत आहेत. या टेस्टमधून निवेदन देण्यासाठी व पोवई नाक्यावर महामोर्चासमोर बोलण्यासाठी मुलींना संधी मिळणार आहे.

महाविद्यालयात प्रवेश घेत असताना पहिल्यांदा जात विचारली जाते. मला दहावीला ८० टक्के गुण होते. माझ्याकडे गुणवत्ता असूनही मी मराठा असल्याने मला सायन्सला प्रवेश मिळाला नाही. मला पर्याय नसल्याने मी आर्टसला प्रवेश घेतला. बारावीला ८५ टक्के गुण मिळाले. माझ्याप्रमाणे भावी पिढीचे नुकसान होऊ नये, यासाठी मी मराठा आरक्षण मागत आहे.

महाविद्यालयात प्रवेश घेताना जात कोणती? ते विचारलं जातं. मराठा समाजातील मुला-मुलींना गुणवत्ता असूनही प्रवेश मिळत नाही. त्याउलट शासकीय वसतिगृहांमध्येही राहायचे झाल्यास तिथेही गुणवत्तेला महत्त्व राहत नाही.
- प्रियांका जगताप- भाविका आरडे, म्हसव

मोबाईल ‘नेट पॅक’चा वापर शेकडो पटीने वाढला..
ओन्ली वन महामोर्चा : गेल्या महिन्यापासून वाढला इंटरनेटचा डेटा वापर

कोरेगाव : सातारा मराठा महामोर्चा यशस्वी करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपवरून संदेश पाठविले जात आहेत. ‘गुडमॉर्निंग’ आणि ‘गुडनाईट’च्या संदेशांना अलविदा केले आहे. फक्त आणि फक्त सातारा मराठा महामोर्चा हाच विषय सगळीकडे दिसत आहे. व्हॉट्सअ‍ॅपचा वापर वाढल्याने इंटरनेटचा वापर शेकडोपटीने वाढला आहे. नेट रिचार्जची संख्या कैक पटीने वाढली आहे.
तरुणाईच्या हातात स्मार्टफोन आल्यापासून ती व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूकवर रमत आहे. त्यावरुन विविध विषयांवर भावना व्यक्त करत असते. मराठा महामोर्चासाठीही तरुणांच्या मदतीला हाच स्मार्टफोन उपयोगी आला आहे. सोशल मीडियावरुन महामोर्चाची माहिती देत आहेत. त्यामुळे इंटरनेटचा वापर निश्चितपणे वाढला आहे.
विशेष म्हणजे एक ग्राहक दोन कंपन्यांचे सीमकार्ड वापरत असून, जास्तीत जास्त इंटरनेटचा वापर केला जात आहे. दिवसभरापेक्षा रात्री दहा ते दोन यावेळेत इंटरनेटचा विशेष म्हणजे व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकचा वापर सर्वाधिक केला जात आहे. विद्यार्थी, महाविद्यालयीन तरुणांसह नोकरदार, इंटरनेटवर विसंबून असल्याचे प्रकर्षाचे दिसून येते.
राज्यात मराठा मूकमोर्चाला परभणी येथून सुरुवात झाली. प्रत्येक जिल्ह्यात मोर्चे निघत असून, मोर्चाचा प्रचार आणि प्रसार व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकद्वारे केला जात आहे.
ई-मेलद्वारे संदेश पाठविले जात असले तरी त्याला मर्यादा येतात. व्हॉट्स अ‍ॅप आणि फेसबुक वापरण्यास सर्वांसाठीच अत्यंत सहज व सुलभ असल्याने त्याची व्याप्ती वाढत आहे. (प्रतिनिधी)े

मोबाईलच्या वॉलपेपरवरही छायाचित्रे
गेल्या महिन्यापासून सोशल मीडियावरून गुडमॉर्निंग, गुडनाईट, हॅप्पी बर्थ डे आणि शुभ दिवसाचे संदेश गायब झाले आहेत. अनेकांच्या मोबाईल्सचे वॉलपेपर, डीपीवर सातारा मराठा महामोर्चाचे फोटो आले आहेत. अनेक नवीन ग्रुपची संख्या वाढत चालली आहे. सर्वत्र सातारा मराठा महामोर्चाची चर्चा आहे. मराठवाडा, विदर्भ, खानदेशासह पश्चिम महाराष्ट्रातील वृत्तपत्रांची कात्रणेही व्हॉट्सअ‍ॅपवर फिरत असून, त्याद्वारे जनजागृती केली जात आहे.
रिचार्ज सेंटरचालकही सज्ज
सहज उपलब्ध होत असलेल्या इंटरनेट सुविधेमुळे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. त्यांच्यापाठोपाठ इतर कंपन्यांच्या नेटच्या रिचार्ज संख्येत शेकडो पटीने वाढ झाली आहे. नजीकच्या आठवड्यात रिचार्जची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन जास्तीत जास्त रिचार्ज ठेवण्याकडे वितरकांसह छोट्या विक्रेत्यांचा कल आहे.

Web Title: Maratha leechibali sentiment hunker!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.