मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट जगात सर्वश्रेष्ठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 12:33 AM2018-05-21T00:33:20+5:302018-05-21T00:33:20+5:30
नेसरी : मराठा लाईट इन्फंट्री भारतीय लष्करातील नावाजलेली रेजिमेंट असून, जगाच्या इतिहासात नंबर वनची सर्वश्रेष्ठ रेजिमेंट असल्याचे प्रतिपादन निवृत्त लेफ्टनंट कर्नल पद्मनाभ अनंतराव पंडितराव यांनी केले.
नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे शहीद मेजर सत्यजित अजितसिंह शिंदे-नेसरीकर यांच्या १३ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी अजितसिंह शिंदे-नेसरीकर, संयोगीतादेवी शिंदे-नेसरीकर, संग्रामसिंह शिंदे, डॉ. राणोजी शिंदे, संजयसिंह शिंदे, आदी नेसरीकर कुटुंबीयांची प्रमुख उपस्थिती होती.
कर्नल पंडितराव म्हणाले, सत्यजित शिंदे हे धाडसी व्यक्तिमत्त्व होते. घरात सुख मिळत असतानादेखील देशसेवेसाठी स्वत:ला वाहून घेऊन देशाच्या कामी आले. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी व त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन नेसरी भागातील जास्तीत जास्त तरुणांनी सैन्यात भरती व्हावे.
ट्रेनिंग व मार्गदर्शनासाठी कधीही बोलवा एकही रुपये मानधन न घेता मार्गदर्शन करीत राहू, असे स्पष्ट केले.
शहीद मेजर सत्यजित शिंदे समितीचे अध्यक्ष अॅड. संदीप फगरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. शशीकला पाटील, गोडसाखरचे माजी संचालक बाबूराव गुरबे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन सरपंच आशिषकुमार साखरे, तर मेजर सत्यजित शिंदे यांच्या पुतळ्याचे पूजन कर्नल पद्मनाम पंडितराव यांच्या हस्ते झाले.
यावेळी गिरीजादेवी शिंदे-नेसरीकर, उपसरपंच रौप मुजावर, आशादेवी तेली, महादेव साखरे, प्रकाशराव दळवी, शिवाजीराव हिडदुगी, वसंतराव पाटील, हरिभाऊ भालेकर, के. अे. शिंत्रे, डोणेवाडीचे सरपंच उत्तम नाईक, तारेवाडीच्या मालुताई भारती, तळेवाडीच्या सरपंच श्वेताताई वसंत देसाई, सावतवाडीच्या सरपंच नंदाताई नांदवडेकर, दयानंद नाईक, गोपाळराव पाटील, शिवाजीराव पाटील, विलासराव हिडदुगी, गोपाळ परीट, आदी उपस्थित होते.
समितीचे उपाध्यक्ष प्रकाश कोरी यांनी सूत्रसंचालन केले. शशिकांत हुक्केरी यांनी आभार मानले.