कोल्हापूरचा मराठा मोर्चा राज्याला दिशा देईल
By admin | Published: September 12, 2016 01:02 AM2016-09-12T01:02:42+5:302016-09-12T01:02:42+5:30
विविध मराठा संघटनांचा विश्वास : मोर्चात लाखोंच्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार; १८ सप्टेंबरला व्यापक बैठक
कोल्हापूर : आतापर्यंत अनेक निर्णय कोल्हापुरात घेतले गेले आणि त्याची राज्यात नव्हे, देशात अंमलबजावणी झाली. याच पद्धतीने अभूतपूर्व असा कोल्हापुरातील मराठा क्रांती मोर्चा हा राज्याला दिशा देईल, असा विश्वास अनेक मराठा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
१५ आॅक्टोबरला काढण्यात येणाऱ्या या मोर्चाच्या तयारीसाठी शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिरात रविवारी सकाळी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत मोर्चा यशस्वी करण्यासाठी अनेक उपयुक्त सूचना करून मोर्चात लाखोंच्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
कोपर्डी घटनेतील दोषींना फाशी द्यावी, अॅट्रॉसिटी कायद्यात दुरुस्ती करावी, मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. तो यशस्वी करण्यासाठी योग्य समन्वय आवश्यक असून, यासाठी प्रत्येकी ३२ सदस्यांचा समावेश असलेल्या ग्रामीण आणि शहरी अशा दोन समित्या स्थापन केल्या जाणार असून, आर्थिक नियोजनासाठी पाच समित्या स्थापन करण्याचे निश्चित करण्यात आले. शाळा, महाविद्यालये, सहकारी संस्था, बँका, सरकारी कार्यालये, तरुण मंडळे, स्वयंसेवी संस्था, संघटना यांच्याशी प्रभावी संपर्क साधण्यात येणार असून, स्वयंसेवकांचीही व्यापक समिती तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. संपर्कासाठी ७३00 व्हॉटस्अॅपचे ग्रुप तयार करण्यात येणार आहेत. हिंदुराव हुजरे पाटील यांनी शासकीय कार्यालयांतील परवानग्या आणण्याची जबाबदारी घेतली.
यावेळी सुरेशदादा पाटील यांनी शिवाजी पेठेतील मराठा पेटून उठला की, मग जिल्ह्यातील मराठा जागा झाला, असे समजा, असे सांगत या मोर्चासाठी ५१ हजार रुपयांची देणगी जाहीर केली. यावेळी वसंतराव मुळीक, दिलीप पाटील, इंद्रजित सावंत, श्रीकांत पाटील, सचिन तोडकर, राजू सावंत, जयश्री चव्हाण, शैलजा भोसले, चंद्रकांत पाटील, चंद्रकांत जाधव, डॉ. प्रल्हाद केळवकर, जयेश कदम, डॉ. सुभाष देसाई, राजेश पाटील, शाहीर दिलीप सावंत, बाबा महाडिक, राम इंगवले, फत्तेसिंह सावंत, मानसिंग घाटगे उपस्थित होते.
लोकप्रतिनिधींबरोबर होणार बैठक
जिल्ह्यातील आजी, माजी खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, कोल्हापूर महानगरपालिकेसह अन्य नगरपालिकांचे आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी या सर्वांची एक व्यापक बैठक रविवारी (दि. १८) जयप्रभा स्टुडिओसमोरील सावंत यांच्या शुभंकरोती सांस्कृतिक भवनमध्ये होणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.
मोर्चाचा मार्ग
मोर्चाची सुरुवात गांधी मैदानातून होईल. यानंतर खरी कॉर्नर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, चप्पल लाईनवरून शिवाजी पुतळा, बिंदू चौक, दसरा चौक, व्हीनस कॉर्नर, बसंत-बहारमार्गे जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चाचा मार्ग राहणार असल्याचे यावेळी वसंतराव मुळीक यांनी जाहीर केले.
आर्थिक मदतीसाठी
सीएंची समिती
या मोर्चासाठी खर्चही मोठा येणार आहे. भगवे झेंडे, बॅनर, पोस्टर, पॅम्प्लेटसाठी निधीची गरज भासणार आहे. त्यामुळे आर्थिक मदतीसाठी पाच समित्या असल्या तरी आर्थिक शिस्त राहावी यासाठी सीएंचीही एक समिती नेमली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
४अभिजित भोसले वैद्यकीय सुविधा पुरविणार
४अंकल ग्रुपकडून होणार पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा
४उमेश पोवार यांच्याकडून दोन हजार ‘टी शर्ट’
तर सत्तापालट होईल
यावेळी एक मराठा म्हणून सर्वच लोकप्रतिनिधींनी १८ सप्टेंबरच्या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन केल्यानंतर जर कुणी उपस्थित राहणार नसेल तर त्यांचे काय करायचे, अशी विचारणा एका युवा कार्यक र्त्यांने केली. यावेळी सामील झाले नाही तर सत्तापालट होईल, असा इशारा दिला.