Maratha Reservation : सर्व पक्षीय आमदार, खासदार मंगळवारी मुख्यमंत्र्यांना भेटणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 07:24 PM2018-08-25T19:24:01+5:302018-08-25T20:47:20+5:30

मराठा आरक्षणावर चर्चा करूण निर्णय घेण्यासाठी राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी करण्याकरिता सर्व पक्षीय आमदार, खासदार यांचे शिष्टमंडळ मंगळवारी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहे.

Maratha Reservation: All party MLAs, MPs meet the Chief Minister on Tuesday | Maratha Reservation : सर्व पक्षीय आमदार, खासदार मंगळवारी मुख्यमंत्र्यांना भेटणार

Maratha Reservation : सर्व पक्षीय आमदार, खासदार मंगळवारी मुख्यमंत्र्यांना भेटणार

Next
ठळक मुद्देसर्व पक्षीय आमदार, खासदार मंगळवारी मुख्यमंत्र्यांना भेटणारमराठा आरक्षणाकरिता विशेष अधिवेशनाची मागणी करणार

कोल्हापूर : मराठा आरक्षणावर चर्चा करूण निर्णय घेण्यासाठी राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी करण्याकरिता सर्व पक्षीय आमदार, खासदार यांचे शिष्टमंडळ मंगळवारी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहे. तसा निर्णय शनिवारी सायंकाळी कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या शिष्टमंडळात राज्यातील सर्वच आमदार, खासदारांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

मराठा आरक्षणाबाबत कोल्हापुरातील आमदार, खासदारांची नेमकी भूमिका काय आहे, ते कशा प्रकारे याप्रकरणी प्रयत्न करीत आहेत हे जाणून घेण्याकरिता शनिवारी सकल मराठा क्रांती मोर्चातर्फे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत १० पैकी ९ आमदार व खासदार राजू शेट्टी उपस्थित होते.

सुरुवातील दिलीप देसाई व इंद्रजित सावंत यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. सरकार फक्त मराठा समाजाला आश्वासन देऊन फसवणूक करीत आहे. मुंबईत मोर्चा काढला तेव्हा सगळ्या मागण्या मान्य केल्या. तसे लेखी दिले. मात्र, त्यांची अंमलबजावणी अद्याप केलेली नाही. आताही नोव्हेंबरपर्यंत मराठा आरक्षण देणार असे सांगितले जाते. मात्र, ते कसे देणार, कधी देणार हे स्पष्ट केले जात नाही.

आमची एकच मागणी आहे की, तुम्ही जे काही करणार आहात ते विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून त्यामध्येच सांगा आणि अधिवेशन कधी बोलावणार याची तारीख सांगा. जोपर्यंत तुम्ही निर्णय जाहीर करीत नाही तोपर्यंत मंगळवार (दि. ४ सप्टेंबर)चा मुंबईतील गाडी मोर्चा आणि आमचे आंदोलन थांबणार नाही, असे देसाई व सावंत यांनी ठासून सांगितले.

त्यानंतर खासदार राजू शेट्टी यांच्यासह सर्व आमदारांनी त्यांची बाजू मांडली. आम्ही मराठा समाजाचे घटक आहोत. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अशीच आमची भूमिका आहे. त्यामुळे तुम्ही जो आदेश द्याल त्याप्रमाणे आंदोलनात सहभागी होण्याची आमची तयारी राहील, असेच सर्वांनी स्पष्ट केले.

खासदार शेट्टी यांनी पश्चिम महाराष्ट्रातील सर्व पक्षीय आमदार, खासदारांना एकत्र बोलावून अशी बैठक घ्यावी. सर्व आमदार, खासदारांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिष्टमंडळाद्वारे भेटून विशेष अधिवेशनाची मागणी करावी, अशा सूचना करतानाच जर मुख्यमंत्र्यांनी प्रतिसाद दिला नाही, तर मात्र व्यापक मोर्चा काढावा, असेही सांगितले.

आमदार हसन मुश्रीफ यांनी सुद्धा शिष्टमंडळाला व्यापकता येण्यासाठी सर्व महाराष्ट्रातील आमदारांना आवाहन करावे, अशी सूचना केली. तसेच आंदोलनाबाबत आम्हाला आदेश द्या, किती गाड्या आणायचे ते सांगा, आमची तशी तयारी असेल, असेही त्यांनी सांगितले.

आमदार सतेज पाटील यांनी मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक असते. याच वेळी मुख्यमंत्र्याना भेटतो. फक्त खासदार शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांशी बोलून त्यांची वेळ घ्यावी, अशी सूचना केली. आमदार राजेश क्षीरसागर यांनी राज्यातील सर्वच आमदार, खासदारांना या शिष्टमंडळात समाविष्ट होण्याचे आवाहन करा, अशी सूचना केली. तसेच शिवसेनेने यापूर्वीच विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केल्याची माहितीही त्यांनी दिली.

 

 

Web Title: Maratha Reservation: All party MLAs, MPs meet the Chief Minister on Tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.