सकल मराठा समाजातर्फे कोल्हापुरात उद्यापासून साखळी उपोषण, अंतरवाली सराटी गावाला देणार भेट
By संदीप आडनाईक | Published: October 28, 2023 03:35 PM2023-10-28T15:35:06+5:302023-10-28T15:57:48+5:30
जिल्ह्यातील प्रत्येक गावी मराठा आरक्षण निर्धार यात्रा काढण्यात येणार
कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या उपोषणाला पाठिंबा म्हणून कोल्हापूर सकल मराठा समाजातर्फे उद्या, रविवार, दि. २९ ऑक्टोबरपासून रोज सकाळी १०.३० ते १ या वेळेत दसरा चौकातील छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याशेजारी रोज साखळी उपोषण करण्यात येणार आहे.
जरांगे पाटील यांने केलेल्या आवाहनानुसार सकल मराठा समाजाने मंत्र्यांना गावबंदी सुरु केली आहे. ती यापुढेही सुरु राहणार आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी दसरा चौकात मंडप उभारण्यात आला आहे. या साखळी उपाषणादरम्यान मराठा समाजाचे आरक्षणासंदर्भात प्रबोधनही करण्यात येणार आहे.
या आठवड्यात कोल्हापूरातील सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते अंतरवाली सराटी गावे म्हणजेच जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या उपोषणस्थळाला भेट देउन त्यांना पाठिंबा व्यक्त करणार आहेत. यावेळी त्यांच्याशी आरक्षणाविषयी कायदेशीर बाबींची चर्चाही करण्यात येईल असे ॲड. बाबा इंदूलकर यांनी सांगितले. यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावी मराठा आरक्षण निर्धार यात्रा काढण्यात येणार असल्याचेही इंदूलकर यांनी सांगितले.
या उपोषणात ॲड. इंदूलकर यांच्यासह बाबा पार्टे, दिलिप देसाई, विजय देवणे, रविकिरण इंगवले, अनिल घाटगे, चंद्रकांत पाटील, सुनिता पाटील, अमर निंबाळकर, ॲड. सतिश नलावडे, अमित अतिग्रे, अविनाश दिंडे, श्रीकांत पाटील उपस्थित राहणार आहेत.
१४ गावांमध्ये राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी
मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलनाला पाठिंबा म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील १४ गावांमध्ये सर्व राजकीय नेत्यांना प्रवेशास बंदी जाहीर केली आहे. या गावांमध्ये मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत आमदार, खासदार तसेच मंत्र्यांना गावात न येण्याबाबत इशारा दिलेला आहे. या गावात प्रवेशबंदीचे बॅनर लावण्यात आलेले आहेत.
ही आहेत प्रवेशबंदीची गावे
यामध्ये खिंडव्हरवडे (ता.राधानगरी), निठूर (ता. चंदगड), रेठरे वारणा (ता.शाहूवाडी), आमजाई व्हरवडे (ता. राधानगरी), हळदवडे आणि एकोंडी (ता. कागल), दिंडनेर्ली, इस्पुर्ली, नांदगाव, नागाव, चुये, येवती, हणबरवाडी, म्हाळुंगे आणि पाडळी खुर्द (ता.करवीर).