Maratha Reservation : कोल्हापुरातील मराठा आरक्षण आंदोलकांच्या जीवितास धोका : इंद्रजित सावंत, देसाई यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 02:11 PM2018-08-17T14:11:23+5:302018-08-17T14:19:18+5:30
मराठा आंदोलनाला दिशाहीन करण्याचा डाव काही राजकीय नेत्यांकडून सुरू आहे. सरकारपुरस्कृत काही संघटनांच्या माध्यमातून आंदोलकांवर हल्ला करण्याचे षड्यंत्र रचले जात असल्याचा आरोप करीत आंदोलकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचा दावा मराठा समाज ठोक आंदोलनाचे समन्वयक इंद्रजित सावंत व दिलीप देसाई यांनी पत्रकार परिषदेत केला.
कोल्हापूर : मराठा आंदोलनाला दिशाहीन करण्याचा डाव काही राजकीय नेत्यांकडून सुरू आहे. सरकारपुरस्कृत काही संघटनांच्या माध्यमातून आंदोलकांवर हल्ला करण्याचे षड्यंत्र रचले जात असल्याचा आरोप करीत आंदोलकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचा दावा मराठा समाज ठोक आंदोलनाचे समन्वयक इंद्रजित सावंत व दिलीप देसाई यांनी पत्रकार परिषदेत केला.
मराठा आरक्षणप्रश्नी कोल्हापुरातील आंदोलन लोकशाही पद्धतीने सुरू असतानाही ते पैशाचा वापर करून दिशाहीन करण्याचे काम काही सरकारपक्षीय आंदोलकांच्या माध्यमातून सुरू आहे. त्यासाठी पोलीस यंत्रणेलाही हाताशी धरले जात आहे. पैसे देऊन आंदोलकांना फोडण्याचे कामही सुरू आहे. ही दडपशाही थांबली नाही तर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा देण्यात आला.
सावंत म्हणाले,‘ तीन दिवसांपूर्वी पालकमंत्री पाटील यांनी वादग्रस्त संभाजी भिडे यांच्याशी कोल्हापुरात शासकीय विश्रामगृहात सुमारे तासभर बंद खोलीत चर्चा केली. त्यामध्ये आंदोलकावर हल्ला करण्याचे षड्यंत्र रचले जात असल्याचा संशय आहे.
त्यामुळे मराठा आरक्षण आंदोलनातील कार्यकर्त्याच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. यावेळी वसंत मुळीक, हर्षल सुर्वे, उमेश पोवार, स्वप्निल पार्टे, गणी आजरेकर, आदी उपस्थित होते.
तोडकर यांच्यावरील कारवाई टीकेमुळेच
सचिन तोडकर यांच्यावर दहा वर्षांपूवीच्या किरकोळ गुन्ह्याबाबत ७ आॅगस्ट रोजी पकड वॉरंट काढले असताना १५ आॅगस्टला मध्यरात्री का कारवाई केली? जुना राजवाडा पोलीस हद्दीतील गुन्हा असताना स्थानिक गुन्हे अन्वेषणला हाताशी धरून शिवाजी विद्यापीठासह इतर वेगवेगळ्या ठिकाणी रात्रभर फिरवून राजारामपुरीच्या पोलीस कोठडीत का डांबले? अशी विचारणाही यावेळी करण्यात आली. नऊ आॅगस्टच्या मोर्चावेळी तोडकर यांनी पालकमंत्र्यांवर बोचरी टीका केल्यामुळेच ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.