Maratha Reservation : दसरा चौकात आंदोलन स्नेहभाव मिलाफ, मुस्लिम बांधवांना बांधल्या राख्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 11:29 AM2018-08-27T11:29:52+5:302018-08-27T11:37:26+5:30
आंदोलन आणि स्नेहभाव यांचा मिलाफ दसरा चौकातील मराठा आरक्षणप्रश्नी सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनस्थळी दिसून आला. रक्षाबंधनाचे औचित्य साधून राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या भगिनी कार्यकर्त्यांनी मुस्लिम बांधवांना राखी बांधून हिंदू-मुस्लिम ऐक्याची कोल्हापूरची परंपरा जपली.
कोल्हापूर : आंदोलन आणि स्नेहभाव यांचा मिलाफ दसरा चौकातील मराठा आरक्षणप्रश्नी सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनस्थळी दिसून आला. रक्षाबंधनाचे औचित्य साधून राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या भगिनी कार्यकर्त्यांनी मुस्लिम बांधवांना राखी बांधून हिंदू-मुस्लिम ऐक्याची कोल्हापूरची परंपरा जपली.
मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी कोल्हापुरात दसरा चौकात गेले महिनाभर ठोक मोर्चाच्या वतीने ठिय्या आंदोलने सुरू आहेत. मराठा आरक्षण आंदोलनात मुस्लिम बांधवांचे नेहमीच मोलाचे योगदान लाभले आहे. त्यांच्या कार्याची दखल राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या भगिनींनी घेतली.
रविवारी आंदोलन आणि स्नेहभावाचे ऋणानुबंध समाजासमोर दिसून आले. गेले ३० दिवस ज्या व्यासपीठावर रक्षाबंधनाचे औचित्य साधून हिंदू भगिनींनी मुस्लिम बांधवांना राखी बांधून हिंदू-मुस्लिम बंधुभावाचे दर्शन घडविले.
यावेळी मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, प्रशासक कादर मलबारी, मुनाफ देसाई यांच्यासह आजरा (ता. शिरोळ) येथील मुस्लिम सुन्नत जमात आलासचे गौस साहेबदाणे, इकबाल पटेल, चाँदपाशा पाटील, इरफान पटेल, फतेहअली पाटील, फारुक देसाई, आदींना राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या सुनंदा चव्हाण, सीमा सरनोबत, मीना नलवडे, सारिका पाटील, वैशाली जाधव, आयेशा खान, चारूशीला पाटील, अलका देवाळकर, राणी देसाई, रंजना पाटील, जयश्री जाधव, आदी भगिनींनी ओवाळून रक्षाबंधनांचा सण साजरा केला.
मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी आता मुलांनीही आंदोलनात उडी घेतली. या मुलांनी कोल्हापुरातील शिवाजी चौकातील शौर्यपीठावर हातात पाटी घेऊन ठिय्या आंदोलनात सहभाग नोंदविला. (छाया : नसीर अत्तार)
शिवाजी चौकात चिमुकल्यांची घुमली साद
ज्या भावी पिढीला आरक्षणाचा लाभ मिळेल, अशा चिमुकल्यांंनी शिवाजी चौकातील शौर्यपीठावरून ‘आरक्षण आमच्या गरजेचे’ अशी एकसाथ आरोळी ठोकत आरक्षण आंदोलनात उडी घेतली. डोक्यावर भगव्या टोप्या घालून, हातात मराठा आरक्षणाच्या मागणीची पाटी घेऊन या मुलांनी व्यासपीठावरून घोषणा दिल्या.
‘एक मराठा - लाख मराठा,’ ‘आरक्षण आमच्या हक्काचे’ अशा घोषणा देत ही सुमारे ५ ते १२ वयोगटातील मुले या ठिय्या आंदोलनात सहभागी झाली होती. यापैकी अद्वैत जाधव या मुलाने आपल्या रोखठोक भाषेत मराठा आरक्षणाबाबत भाषण दिले.
शौर्यपीठावर एका बहिणीने रक्षाबंधनाचे औचित्य साधून आपल्या भावाला राखी बांधून ओवाळणी ‘मराठा आरक्षण मिळवून दे,’ अशी भावनिक साद घातली. या व्यासपीठावर राजे मेवेकर, काका धर्माधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांसह छत्रपती ग्रुपचे ऋतुराज सरनोबत, राज मेवेकरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ठिय्या आंदोलनात सहभाग दर्शवून पाठिंबा दिला.
मराठा आरक्षणप्रश्नी शौर्यपीठाच्या कार्यकर्त्यांनी खासदार उदयनराजे यांची सातारा येथे भेट घेऊन त्यांना कोल्हापुरात येऊन ठिय्या आंदोलनात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले. (छाया : नसीर अत्तार)
उदयनराजेंना निमंत्रण
शौर्यपीठाच्या वतीने आंदोलकांनी खासदार उदयनराजे यांची शनिवारी रात्री सातारा येथे भेट घेऊन त्यांना कोल्हापूरला येण्याचे निमंत्रण दिले. त्यांनी हे निमंत्रण स्वीकारले असून, लवकरच कोल्हापूरला मराठा आरक्षणबाबत रोखठोक भूमिका मांडण्यासाठी कोल्हापूरला येण्याचे मान्य केले. यावेळी जयदीप शेळके, उदय लाड, शिवाजीराव लोंढे, राजेंद्र चव्हाण, दादासो देसाई, अक्षय धामणे, जनार्दन पाटील, आदी उपस्थित होते.