Maratha Reservation: मोदींनी मनात आणले तर मराठा आरक्षणाचा निर्णय शक्य - शाहू छत्रपती 

By भारत चव्हाण | Published: September 12, 2023 01:47 PM2023-09-12T13:47:33+5:302023-09-12T13:51:13+5:30

वारंवार मागणीला बगल देणे चुकीचे

Maratha reservation decision is possible if Modi brings it to mind says Shahu Chhatrapati | Maratha Reservation: मोदींनी मनात आणले तर मराठा आरक्षणाचा निर्णय शक्य - शाहू छत्रपती 

Maratha Reservation: मोदींनी मनात आणले तर मराठा आरक्षणाचा निर्णय शक्य - शाहू छत्रपती 

googlenewsNext

भारत चव्हाण

कोल्हापूर : महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाची मागणी राज्य व केंद्र सरकारने गांभीर्याने घ्यावी, सरकारमध्ये असणारे राज्यकर्ते मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे, आमचा आंदोलनाला पाठिंबा आहे असे सांगत असतात, पण जेव्हा देण्याची वेळ येते तेव्हा वेळकाढूपणा स्वीकारत आहेत. म्हणूनच केंद्र सरकारने जास्त काळ हा प्रश्न चिघळत न ठेवता संसदेचे विशेष अधिवेशन बोलविलेच आहे तर त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घ्यावा, त्यांनी मनात आणले तर हे शक्य आहे, असे आरक्षणाचे जनक असलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे वंशज शाहू छत्रपती यांनी सोमवारी येथे लोकमतशी बोलताना सांगितले.

महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. राज्यभर आंदोलने सुरू आहेत. अंतरवाली सराटी येथे मनोज पाटील जरांगे यांचे आमरण उपोषण सुरू आहे. म्हणून याविषयी शाहू छत्रपती यांची भूमिका जाणून घेतली. शाहू महाराज म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर तुम्हाला केंद्र सरकारकडे गेले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समजावले पाहिजे. कायद्याच्या पातळीवर टिकणारे आरक्षण देण्यासाठी कायद्यात बदल केला पाहिजे आणि तो मोदीच करू शकतात हे यापूर्वीही मी सांगितले आहे. तरीही राज्य पातळीवरील नेते मोदींना भेटायला जात नाहीत. आरक्षणाच्या मुद्याला बगल देण्याचा प्रयत्न आहे. अशाने हा प्रश्न सुटणार नाही तर अडचणीत आणणारा ठरू शकतो. त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी प्रथम मोदींना भेटून तेथेच याबाबतचा निर्णय घेण्याचा आग्रह धरावा.

सारखी सारखी किती वेळा मागणी करायची, कितीवेळा आंदोलन करायचे? असा सवाल करतानाच केंद्र सरकारला निर्णय घेणे शक्य आहे. दोन तृतियांश बहुमत त्यांच्याकडे आहे. मोदींनी मनात आणले तर आरक्षण देण्याचा निर्णय होऊ शकतो. आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे कारण सांगितले जाते. माझे तर म्हणणे आहे की ही मर्यादा वाढवा, त्याशिवाय प्रश्न सोपा होणार नाही. समजा उद्या केंद्रात भाजपची सत्ता आली नाही किंवा दोन तृतियांश इतके बहुमत कोणत्याच पक्षाला मिळाले नाही तर पुन्हा या आरक्षणाचा मुद्दा बाजूला जाण्याची भीती आहे. म्हणून मोदींनी मराठा समाजाला योग्य न्याय देऊन मोठेपणा घ्यावा, असे आवाहन शाहू महाराज यांनी केले.

आधी निर्णय घ्या, बाकीच्या प्रक्रिया नंतर

आज देतो, उद्या देतो, समिती नेमतो, आयोग नेमतो अशी आश्वासने देत बसण्यापेक्षा केंद्र सरकारने विशेष अधिवेशनात आधी आरक्षण देण्याचा निर्णय घ्यावा आणि नंतर बाकीच्या प्रक्रिया पार पाडाव्यात. आज दबावापोटी काही तरी आदेश काढले जातील; पण त्याने हा प्रश्न सुटणार नाही. न्यायालयाच्या पातळीवर ते टिकणार नाही. त्यामुळे खेळवत ठेवण्याचा प्रयत्न होऊ नये, अशी अपेक्षाही शाहू छत्रपतींनी व्यक्त केली.

पोलिसांनी लाठीमार का केला?

शांततेत चाललेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार का केला? पोलिस लाठीमार करत आहेत. आंदोलक पळून जात असतानाही त्यांचा पाठलाग करुन मारले जातेय हे समजण्या पलिकडचे आहे. उपोषण गांभीर्याने घ्या. सरकार खंबीर आहे हे दाखविण्यासाठी अतिखंबीर होण्याचे कारण नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी उपोषणस्थळी जाऊन लोकांना भेटत असतील तर त्यात कमीपणा वाटून घेऊ नये, असेही शाहू महाराज यांनी सांगितले.

Web Title: Maratha reservation decision is possible if Modi brings it to mind says Shahu Chhatrapati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.