Maratha Reservation : कोल्हापुरात दसरा चौकात ठिय्या, बिंदू चौकात आत्मचिंतन, भर पावसातही आंदोलन सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 06:52 PM2018-08-14T18:52:33+5:302018-08-14T18:54:58+5:30
मराठा आरक्षण मागणीसाठी दसरा चौकात गुरुवारपासून ग्रामीण भागातील जथ्थे येऊन ठिय्या आंदोलनात दिवसभर सहभागी होणार आहेत, तर बिंदू चौकात मंगळवारी सकल मराठा समाजाच्यावतीने भर मुसळधार पावसातही आत्मचिंतन ठिय्या आंदोलन केले. यावेळी ‘जय भवानी-जय शिवाजी’, ‘मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे’ अशा घोषणा देण्यात आल्या.
कोल्हापूर : मराठा आरक्षण मागणीसाठी दसरा चौकात गुरुवारपासून ग्रामीण भागातील जथ्थे येऊन ठिय्या आंदोलनात दिवसभर सहभागी होणार आहेत, तर बिंदू चौकात मंगळवारी सकल मराठा समाजाच्यावतीने भर मुसळधार पावसातही आत्मचिंतन ठिय्या आंदोलन केले. यावेळी ‘जय भवानी-जय शिवाजी’, ‘मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे’ अशा घोषणा देण्यात आल्या.
सकल मराठा समाज ठोक आंदोलनाच्यावतीने येथील दसरा चौकात गेले २१ दिवस ठिय्या आंदोलन सुरू आहे. मंगळवारीही स्थानिक कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलनात सहभाग नोंदवला, तर माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांनी ठिय्या आंदोलनस्थळी भेट देऊन ग्रामीण भागातूनही मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांचे जथ्थे ठिय्या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे सांगून त्यांनी १६ आॅगस्टपासून नियोजन करावे, अशा सूचना केल्या.
बिंदू चौकातही आत्मचिंतन
मूकमोर्चा, ठिय्या आंदोलन, रास्ता रोको, महामार्ग रोको, आदी आंदोलने करूनही शासनाला जाग न आल्याने अनेक सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर युवक संतापले आहेत; त्यामुळे संतापाने आता तरुण रस्त्यावर उतरण्याच्या मन:स्थितीत आहे.
तमिळनाडूमध्ये जयललिता यांनी ज्याप्रमाणे पेरियार समाजाला आरक्षण दिले, त्याच पार्श्वभूमीवर मराठा समाजालाही आरक्षण मिळावे, अशी मागणी पुढे येत आहे. त्यासाठी बिंदू चौकात सकल मराठा समाजाच्यावतीने भर पावसातही आत्मचिंतन आंदोलन केले.
‘एक मराठा-लाख मराठा’, आरक्षण मिळालेच पाहिजे’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. आतापर्यंत मराठा आरक्षणासाठी झालेला लढा, आंदोलनाची पुढील दिशा याबाबत आढावा घेण्यात आला. आरक्षण मिळेपर्यंत हा लढा तीव्र करण्याचाही यावेळी निर्धार करण्यात आला. भर मुसळधार पावसातही हे आत्मचिंतन आंदोलन सुरू राहिले, त्यांनी केलेल्या घोषणांनी बिंदू चौक दुमदुमला.
या आंदोलनात प्रसाद जाधव, परेश भोसले, प्रकाश सरनाईक, राजू जाधव, राहुल इंगवले, चंद्रकांत पाटील, विजय करजगार, विशाल निकम, शिवराजसिंह गायकवाड, राजेंद्र चव्हाण, अॅड. चारूलता चव्हाण, किशोर डवंग, उदय लाड, संपतराव पाटील, राजू सावंत, अनिल कदम, संग्राम पाटील-कौलवकर, संगीता नलवडे, नील सूर्यवंशी, सचिन जगदाळे, बबन सावरे, अशोक नाईक, शिवाजी लोंढे, विठ्ठल पेडणेकर, राजेंद्र बुड्डे, सतीश कोरे, मनीष क्षीरसागर, दादासाहेब देसाई, सुभाष पाटील, अजय चौगुले, आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
बुधवारचे आंदोलन
- ठोक आंदोलन : सकल मराठा समाजाच्या ठोक मोर्चाच्यावतीने सकाळी ८ वाजता दसरा चौकातून सर्व कार्यकर्ते शांततेत एकत्रित जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहणासाठी जाणार आहेत.
- सकल मराठा : सकल मराठा समाजाच्यावतीने दुपारी साडेबारा वाजता रंकाळा तलाव संध्यामठनजीक उदय लाड आणि सकल मराठाचे कार्यकर्ते पाण्यावर शवासन करत आत्मक्लेश आंदोलन करणार.