मराठा आरक्षणप्रश्नी कोल्हापुरात गांधी जयंतीपासून आमरण उपोषण, सकल मराठा समाजाच्या बैठकीत घोषणा

By भीमगोंड देसाई | Published: September 12, 2023 03:18 PM2023-09-12T15:18:15+5:302023-09-12T15:18:34+5:30

ओबीसीतून आरक्षण द्यावे; इंदूलकर, देसाई उपोषण करणार 

Maratha reservation issue in Kolhapur hunger strike to Gandhi Jayanti | मराठा आरक्षणप्रश्नी कोल्हापुरात गांधी जयंतीपासून आमरण उपोषण, सकल मराठा समाजाच्या बैठकीत घोषणा

मराठा आरक्षणप्रश्नी कोल्हापुरात गांधी जयंतीपासून आमरण उपोषण, सकल मराठा समाजाच्या बैठकीत घोषणा

googlenewsNext

कोल्हापूर : मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण द्या, सन २०११ मध्ये देशात जातनिहाय केलेल्या जनगणनेचा अहवाल जाहीर करा, यासह विविध मागण्यांसाठी सकल मराठा समाजातर्फे अॅड. बाबा इंदूलकर आणि दिलीप देसाई हे येथील छत्रपती शिवाजी चौकात २ ऑक्टोबर या गांधी जयंती दिवसापासून आमरण उपोषण करतील. बैठकीत अॅड. इंदूलकर यांनी ही घोषणा केली. दरम्यान, टप्याटप्यात यामध्ये अनेक मराठा बांधव सहभागी होण्याचा निर्णय मंगळवारी सकल मराठा समाजातर्फे येथील विठ्ठल मंदिरात आयोजित बैठकीत घेण्यात आला.

अॅ. इंदूलकर म्हणाले, देश राज्यघटनेवर चालतो. यामुळे पन्नास टक्यावरील ईडब्लूएसचे दहा टक्यांचे आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने घटनेत दुरूस्ती केली. हे आरक्षण केवळ मराठा समाजासाठी नाही. यामुळे याचा फारसा लाभ समाजाला होत नाही. ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्याची कुजबूज सुरू झाल्यानंतर सत्तेतील बडे राजकीय नेते ओबीसींना रस्त्यावर उतरवत आहेत. मराठा समाजाविरोधात बोलण्यास लावत आहे. हे मोडीत काढले जाईल. पुन्हा एकदा सरकारच्या खुर्चीखाली जाळ येण्यासाठी विविध मार्गाने आंदोलन करण्याची गरज आहे. म्हणूनच आरक्षणासाठी २ ऑक्टोबरला गांधी जयंतीपासून माझ्यासह दोघेजण उपोषण सुरू करू.

सुजीत चव्हाण म्हणाले, सरकार कोणाचेही असले तरी मराठा समाजाची फसवणूकच झाली आहे. आजपर्यंत आरक्षण न दिलेलेच मराठा समाजाबद्दल आता सहानुभूती दाखवत आहेत. मराठा समाज दुसऱ्याचे काढून आम्हाला आरक्षण द्या, अशी मागणी करीत नाही. आमच्या हक्काचे आरक्षण मिळावे, अशी त्यांची मागणी आहे. आरक्षणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्य, केंद्र सरकारकडे पाठपुरावा करीत आहेत. संध्याकाळपर्यंत आरक्षणप्रश्नी चांगली बातमी येईल. समाजाला रस्त्यावर उतरण्याची वेळ येणार नाही.

रविकिरण इंगवले म्हणाले, सद्य स्थितीत आर्थिक निकषावर आरक्षण मिळावे, अशी मागणी केली पाहिजे. सरकार आणि नेत्यांचे डोळ उघडतील असे आंदोलन करण्याची गरज आहे.

यावेळी रूपेश पाटील, अनिल घाटगे, किशोर घाटगे, सुनीता पाटील आदींची भाषणे झाली. बैठकीस ठाकरे गट शिवसेनेचे संजय पवार, सुशील भांदिगरे, बाबा पार्टे, धनंजय सावंत, अमरसिंह निंबाळकर, उदय भोसले, सुनील मोदी आदी उपस्थित होते.
 

Web Title: Maratha reservation issue in Kolhapur hunger strike to Gandhi Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.