मराठा आरक्षणप्रश्नी कोल्हापुरात आज धरणे, आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 01:05 PM2023-10-02T13:05:24+5:302023-10-02T13:05:52+5:30
''पालकमंत्री बोलका पोपट; काका पुतण्या का बोलत नाहीत?''
कोल्हापूर : मराठा आरक्षणप्रश्नी सकल मराठा समाजातर्फे आज, सोमवारी येथील पापाची तिकटी येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ सकाळी दहा वाजता एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्याचा निर्णय हिंदू एकताच्या कार्यालयातील बैठकीत झाला. बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. प्रशांत देसाई, ॲड. महादेवराव आडगुळे, ॲड. शिवाजीराव राणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
ॲड. देसाई म्हणाले, मराठा आरक्षणासाठीआंदोलनाची तीव्रता टप्प्याटप्प्याने वाढवत नेऊ. कोणाचाही जीव स्वस्त नाही. यामुळे सोमवारपासून ॲड. बाबा इंदुलकर, दिलीप देसाई यांनी उपोषणाचा घेतलेला निर्णय मागे घ्यावा. त्याऐवजी पापाची तिकटी येथे एक दिवसाचे धरणे आंदोलन करू. आरक्षणासाठी कायद्याची लढाई लढावी लागणार आहे. यासाठी विधी परिषद घेऊ.
ॲड. आडगुळे म्हणाले, जरांगे-पाटील यांनी सर्वच मराठ्यांना कुणबीचे दाखले द्यावेत, अशी मागणी केली आहे. याउलट धनगर समाज, ओबीसी समाजही आरक्षणासाठी आंदोलन करीत आहे. यामुळे शासन गोंधळलेले आहे. बोळवण करीत आहे. पन्नास टक्क्यांवर दिले गेलेले आरक्षण टिकत नाही. यामुळे घटना दुरुस्ती करून ही मर्यादा उठवली पाहिजे. शासनाने आरक्षणप्रश्नी जरांगे पाटील यांना मुदत दिली आहे. त्या मुदतीची वाट पाहूया. मुदतीनंतर आरक्षण न दिल्यास लढा व्यापक करू.
शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष संजय पवार म्हणाले, मराठा आरक्षणप्रश्नी मुश्रीफ यांनी बैठकीचे आश्वासन दिले होते. मात्र, बैठक झाली नाही. कोणताही मंत्री असो तो समाजाला फसवण्याचे काम करीत आहे. मराठा मंत्रीही मराठ्यांना विसरले आहेत. आरक्षण देण्याची त्यांची मानसिकता नाही. भडकवण्याचे, फसविण्याचे काम ते करीत आहेत. त्यांना जाब विचारण्याची वेळ आली आहे.
विजय देवणे म्हणाले, अजित पवार यांची गाडी अडवणार असल्याचे जाहीर केल्यानंतर मुश्रीफ यांनी आश्वासन देऊन वेळाकाढूपणा केला आहे. यामुळे मराठा समाजाने मंत्र्यांना जाब विचारण्याची गरज आहे.
ॲड. शिवाजीराव राणे म्हणाले, सेक्शन ११ वर जोर देऊया. आरक्षणप्रश्नी शासनाने जरांगे-पाटील यांना आश्वासन दिले आहे. ते पाळले नाही तर दुप्पट वेगाने आंदोलन करू. कायदेशीर आणि लोक आंदोलनातून आरक्षणासाठी शासनावर दबाव वाढवू. आजपर्यंत कोणत्याही पुढाऱ्याने आरक्षण दिले नाही. यापुढेही लवकर मिळेल असे वाटत नाही. पक्ष, पुढाऱ्यावर विश्वास ठेवायला नको. लढत राहू. आंदोलनाची धार वाढवत नेत आरक्षणासाठी कोल्हापुरात मंत्रिमंडळाची बैठक घेण्यास भाग पाडू.
बाबा पार्टे म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आरक्षणप्रश्नी बैठक घेतो असे सांगून फसवले आहे. पालकमंत्री, मुश्रीफ यांनी गोड बोलून फसवले आहे. आता जो फसवेल त्याच्या विरोधात आंदोलन करण्याची गरज आहे.
अनिल घाटगे, किशोर घाटगे, दिलीप देसाई, ॲड. बाबा इंदूलकर यांची भाषणे झाली. बैठकीस के. के. सासवडे, ॲड. अजित माेहिते, वैशाली महाडिक, आर. के. पोवार, ॲड. गिरीश खडके आदी उपस्थित होते.
काका पुतण्या का बोलत नाहीत ?
रविकिरण इंगवले म्हणाले, आरक्षणाच्या विषयात सगळेच नेते एका माळेचे मणी आहेत. भाजप, शिवसेनेचे सरकार असताना आरक्षण दिले. ते टिकले नाही. पण त्यांनी दिले तरी. मात्र आरक्षणावर काका, पुतण्या का बोलत नाहीत ?
पालकमंत्री बोलका पोपट
जयकुमार शिंदे यांनी आरक्षणप्रश्नी पालकमंत्री दीपक केसरकर काहीही करीत नाहीत. ते बोलका पोपट आहेत, अशी टीका केली. रंकाळा, अंबाबाई मंदिर परिसर विकासासाठी निधी आणून विकास करीत असल्याचे सांगूनही ते फसवत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.