Maratha reservation- न्यायालयात वकील उपस्थित राहत नाहीत हे दुर्दैव : संभाजीराजेंची खंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2020 11:16 AM2020-10-28T11:16:03+5:302020-10-28T11:18:04+5:30
Maratha reservation, Court, Sambhaji Raje Chhatrapati, kolhapur मराठा आरक्षणप्रकरणी सुरू असलेल्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारचे वकील सुनावणीला उपस्थित राहत नाहीत, ही अतिशय दुर्दैवी तसेच गंभीर बाब आहे, अशा शब्दांत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे.
कोल्हापूर : मराठा आरक्षणप्रकरणी सुरू असलेल्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारचे वकील सुनावणीला उपस्थित राहत नाहीत, ही अतिशय दुर्दैवी तसेच गंभीर बाब आहे, अशा शब्दांत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे.
संभाजीराजे मंगळवारी दिल्लीत होते. मंगळवारी होणाऱ्या मराठा आरक्षण सुनावणीकडे लक्ष होते, परंतु राज्य सरकारचे वकील न्यायालयात उपस्थित राहिल्या नसल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पत्रकारांना यासंदर्भात माहिती देताना त्यांनी सांगितले की, मराठा आरक्षण प्रकरणावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने चार आठवड्यांसाठी तहकूब केली आहे. तत्पूर्वी, राज्य सरकारचे वकील उपस्थित न राहिल्याने काही काळ सुनावणी स्थगित करावी लागली होती. हा राज्य सरकारचा हलगर्जीपणा असून त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत.
मराठा आरक्षणविषयक उपसमितीचे अध्यक्ष असलेल्या अशोकराव चव्हाण यांना यापूर्वी मी अनेकवेळा सावध केले होते. ही केस गांभीर्याने घेण्यासंबंधी अधिकारी वर्गाला सूचना देऊन अधिकारी आणि वकील मंडळी यांच्यामधील समन्वय त्यांनी स्वतः साधायला हवा होता. सामान्य प्रशासन विभागाच्या सचिवांना सूचना देऊन जबाबदाऱ्या निश्चित करायला हव्यात. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू ही पुराव्यानिशी भक्कमपणे मांडणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
न्यायालयीन पातळीवरील कामकाजाबाबतचे नियोजन कमी पडत असल्याने हा गोंधळ उडाला आहे. सरकारची भूमिका न्यायालयात वकिलांमार्फत मांडली पाहिजे, परंतु त्यामध्ये कसलेही नियोजन दिसत नाही, याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.