मराठा आरक्षण हीच अण्णासाहेबांना आदरांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:24 AM2021-04-23T04:24:42+5:302021-04-23T04:24:42+5:30
कोल्हापूर : सरकारने मराठा आरक्षण दिले नाही तर मी उद्याचा सूर्य बघणार नाही, अशी भीष्मप्रतिज्ञा अण्णासाहेबांनी २३ मार्च ...
कोल्हापूर : सरकारने मराठा आरक्षण दिले नाही तर मी उद्याचा सूर्य बघणार नाही, अशी भीष्मप्रतिज्ञा अण्णासाहेबांनी २३ मार्च रोजी स्वतःवर गोळी झाडून पूर्ण केली. त्यांच्या बलिदानानंतर ३८ वर्षे लोटली, तरीही आरक्षण मिळाले नाही, सरकारने ही मागणी पूर्ण करून अण्णासाहेब पाटील यांना खरी आदरांजली वाहावी, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठा महासंघाचे उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केले.
मराठा समाजाचे नेते व माथाडी कामगारांचे पुढारी अण्णासाहेब पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त मार्केट यार्ड येथे कोल्हापूर जिल्हा माथाडी कामगार सहकारी संस्थेत झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सदाशिव खोंदल, तुकाराम खोंदल, सर्जेराव कोळी, खोतवाडीचे माजी सरपंच तानाजी कोळापटे, नांदारीचे सरपंच बबन लांबोरे यांचा सत्कार करण्यात आला.
मुळीक म्हणाले, अण्णासाहेबांनी मराठ्यांप्रमाणेच महाराष्ट्रातील तमाम माथाडी समाजावर प्रेम केले. त्यांनी या देशात पहिला माथाडी कायदा केला. हमालऐवजी माथाडी हा शब्दप्रयोग करून समाजाला न्याय व आदर दिला. संघटित होणे ही काळाची गरज ओळखून त्यांनी मराठा व माथाडी समाजाला एकत्र आणण्याचे काम केले.
दीपक पाटील यांनी स्वागत केले. यावेळी बाबूराव गावडे, गोविंद खोंदल, माजी अध्यक्ष दिलीप पोवार, राहुल लादे, भागोजी कात्रट, युवराज खोपकर, सागर माटक, बिरदेव शिंदे, संभाजी पाटील, लालासाहेब पोवार, अवधूत पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
--
फोटो नं २२०४२०२१-कोल-आण्णासाहेब पाटील
ओळ : कोल्हापुरात मार्केट यार्डात गुरुवारी माथाडी नेते अण्णासाहेब पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी वसंतराव मुळीक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
--