Maratha Reservation : कऱ्हाडात मुंडण करून शासनाचा निषेध, आंदोलनाचा सातवा दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 02:03 PM2018-08-07T14:03:40+5:302018-08-07T15:58:16+5:30
गेल्या सहा दिवसांपासून कऱ्हाड येथील दत्त चौकातील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर मराठा समाज आरक्षणप्रश्नी मराठा समाजातील माता-भगिनींनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
कऱ्हाड : गेल्या सहा दिवसांपासून कऱ्हाड येथील दत्त चौकातील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर मराठा समाज आरक्षणप्रश्नी मराठा समाजातील माता-भगिनींनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
आंदोलनाच्या सातव्या दिवशी मंगळवारी चौकात एक मराठा, लाख मराठा असा जयघोष करीत मराठा समाजबांधवांनी मुंडण करून शासनाचा निषेध नोंदविला. कोणत्याही परिस्थितीत आता मागे हटणार नाही, असा निर्धारही यावेळी व्यक्त केला.
मराठा समाजास आरक्षण मिळावे, या एकमुखी मागणीसाठी बुधवार, दि. १ आॅगस्टपासून कऱ्हाडात मराठा समाजातील माता-भगिनींनी ठिय्या आंदोलन सुरू केले. या आंदोलनादरम्यान कृष्णा नदीपात्रात अर्धजलसमाधी, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष चरेगावकर यांच्या निवासस्थानासमोर घोषणाबाजी, रिक्षा रॅली काढली.
यादरम्यान, अनेक राजकीय पक्षातील लोकप्रतिनिधींनी आंदोलनास भेट देत पाठिंबा दर्शविला आहे. मंगळवारी सातव्या दिवशी आक्रमक झालेल्या मराठा बांधवांतील काही मराठा बांधवांनी आपले मुंडण करून शासनाचा निषेध नोंदविला. यावेळी मोठ्या संख्येने मराठा समाजातील माता-भगिनी, मराठा बांधव उपस्थित होते.