मराठा आरक्षणप्रश्नी सरकारकडून फसवणूक -- : दिलीप जगताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 01:16 AM2019-06-15T01:16:25+5:302019-06-15T01:17:18+5:30
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पूर्वीच्या कॉँग्रेस, राष्टÑवादी आघाडीच्या सरकारने फसवणूक केली. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवीत हे भाजप सरकारही आरक्षणप्रश्नी समाजाची फसवणूक करीत आहे, असा आरोप अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्टय संयुक्त चिटणीस दिलीप जगताप यांनी शुक्रवारी
कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पूर्वीच्या कॉँग्रेस, राष्टÑवादी आघाडीच्या सरकारने फसवणूक केली. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवीत हे भाजप सरकारही आरक्षणप्रश्नी समाजाची फसवणूक करीत आहे, असा आरोप अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्टय संयुक्त चिटणीस दिलीप जगताप यांनी शुक्रवारी येथे केला.
शाहू स्मारक भवन येथे मराठा महासंघाच्या शहर शाखेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांची प्रमुख उपस्थिती होती.
दिलीप जगताप म्हणाले, मराठा महासंघाच्या माध्यमातून १९७८ पासून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली जात आहे; परंतु अद्यापही आरक्षणाचा प्रश्न पूर्णपणे सुटलेला नाही. यापूर्वीच्या आघाडी सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली आहे; तर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवीत भाजप सरकारनेही समाजाची फसवणूक केली आहे.
ते म्हणाले, मराठा महासंघ हा कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधील नाही. सध्या सर्वच पक्षांत मराठा समाजाचे नेते आहेत. त्यांनी मराठा आरक्षण प्रश्नावर पक्ष बाजूला ठेवून पुढे येण्याची गरज आहे. आरक्षण नसल्याने गुणवत्ता असूनही मराठा समाजातील तरुणांचे नुकसान होत आहे. अशीच स्थिती राहिली तर अस्तित्वासाठी मराठा तरुणांना मोठा संघर्ष करावा लागणार आहे.
वसंतराव मुळीक म्हणाले, मराठा महासंघाचे सभासद वाढविण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी स्वीकारून पुढील दोन महिन्यांत पाच हजार सभासदांची नोंदणी करावी.
यावेळी नूतन शहराध्यक्ष अजय इंगवले, शशिकांत पाटील, उत्तम जाधव, सुनील पाटील, शंकरराव शेळके, शैलजा भोसले, अवधूत पाटील, आदींची यावेळी उपस्थिती होती.
मराठा महासंघ ही कार्यकर्ता घडविणारी फॅक्टरी
मराठा महासंघ ही राजकारणापासून अलिप्त असलेली व समाजकार्य करणारी संघटना आहे. ही संघटना म्हणजे कार्यकर्ता घडविणारी फॅक्टरी आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनीही नव्याने सभासद नोंदणी करून संघटनात्मक बांधणी करावी व मराठा महासंघाचा विस्तार करावा, असे आवाहन दिलीप जगताप यांनी केले.
शहराध्यक्षपदी अजय इंगवले यांची निवड
मेळाव्यात सामाजिक कार्यकर्ते अजय इंगवले यांची मराठा महासंघाच्या शहराध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर केले. दिलीप जगताप यांच्या हस्ते इंगवले यांना निवडीचे पत्र देण्यात आले. या निवडीबद्दल जगताप यांच्या हस्ते इंगवले यांचा सत्कार केला. यावेळी पुढील दोन महिन्यांत मराठा महासंघासाठी १० हजार सभासदांची नोंदणी करण्याची ग्वाही इंगवले यांनी दिली.