Maratha Reservation: विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी करणार, मंत्री हसन मुश्रीफांची ग्वाही
By संदीप आडनाईक | Published: October 30, 2023 04:01 PM2023-10-30T16:01:17+5:302023-10-30T16:03:19+5:30
'जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत कोणताही सार्वजनिक कार्यक्रम नाही'
कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीला माझा पाठिंबा आहे. आज मुंबईत होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आरक्षणाचा सकाऱात्मक निर्णय घेण्यासाठी दोन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे करणार आहे, जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत कोणताही सार्वजनिक कार्यक्रम करणार नसल्याची ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी सकल मराठा समाजाच्या आंदोलकांना दिली. मनोज जरांगे पाटील यांनी पाणी तरी घ्यावे अशी कळकळीची विनंतीही मुश्रीफ यांनी यावेळी केली.
सकल मराठा समाजाचे कोल्हापूरात ऐतिहासिक दसरा चौकात सोमवारी दुसऱ्या दिवशी साखळी उपोषण सुरु आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुश्रीफ यांनी मराठा आंदोलकांची भेट घेतली. प्रारंभी वसंतराव मुळीक, ॲड. बाबा इंदूलकर, दिलिप देसाई, बाबा पार्टे आदी नेत्यांनी मराठा आंदोलकांची भूमिका मांडली. त्यानंतर पालकमंत्री मुश्रीफ यांनी या आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत सार्वजनिक कार्यक्रम करणार नाही अशी भूमिकाही त्यांनी जाहीर केली.
राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज, मंगळवारी मुंबईत होत आहे. या बैठकीत मराठा आरक्षणाविषयी सकारात्मक निर्णय घेण्यासाठी मंत्रीमंडळाचे दोन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावण्याची विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार डेंग्यूने आजारी आहेत, तरीही त्यांच्याकडे याविषयी विनंती करु असे मुश्रीफ म्हणाले.
जरांगे पाटील यांनी पाणी घ्यावे..
मनोज जरांगे पाटील यांनी प्रकृतीची काळजी घ्यावी, त्यांनी सर्वांची प्रार्थना ऐकावी, पाणी घ्यावे आणि मराठा समाजातील कार्यकर्त्यांच्या विनंतीचा आदर करावा असे आवाहनही मुश्रीफ यांनी यावेळी केले.
सार्वजनिक कार्यक्रम करणार नाही..
शाहू जन्मस्थळ आणि दिव्यांग विषयांसंदर्भातील दोन बैठका जिल्हाधिकारी कार्यालयात आहेत, त्या पूर्ण करण्याची परवानगी मराठा समाजाने द्यावी. त्यानंतर एकही सार्वजनिक कार्यक्रम मी करणार नाही अशी ग्वाही मुश्रीफ यांनी यावेळी दिली.