मराठा आरक्षणप्रश्नी क्रांतिदिनी कोल्हापूर बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 12:38 AM2018-07-23T00:38:24+5:302018-07-23T00:38:31+5:30
कोल्हापूर : मराठा क्रांती संघटनेच्यावतीने ९ आॅगस्ट क्रांतिदिनी कोल्हापूर जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. या दिवशी कोणतेही गुन्हे नोंदवा, ठोक मोर्चा काढणारच; तसेच यावेळी मंत्र्यांच्या गाड्या अडवून त्या फोडणार असल्याचा इशारा मराठा क्रांती संघटनेचे जिल्हाप्रमुख परेश भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिला. दरम्यान, मोर्चाच्या जनजागृतीसाठी दि. ३१ जुलै रोजी सकाळी ११ वाजता ताराराणी चौकातून दुचाकी रॅली काढून अंबाबाई मंदिरात देवीचा गोंधळ घालून दंडवत घालण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
भोसले म्हणाले, मराठा समाजाचे लाखोंच्या संख्येने राज्यभर ५८ मूकमोर्चे निघाले; पण शासनाने ठोस निर्णय घेतले नाहीत; मराठा क्रांती संघटनेमध्ये राज्यातील विविध भागांत काम करणाऱ्या २८ मराठा संघटना एकत्र आल्या असून, त्यांच्यावतीने राज्यात ठोक मोर्चे काढण्यात येत आहेत. संयमाने काही मिळणार नसल्याची मानसिकता मराठा समाजाची झाली आहे. त्याकरिता ९ आॅगस्ट रोजी ‘कोल्हापूर जिल्हा बंंद’ची हाक देण्यात आली आहे. या दिवशी सकाळी ११ वाजता दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर ठोक मोर्चा काढण्यात येणार आहे.
आजपर्यंत नेत्यांनी मराठा समाजाचा फक्तमतासाठी उपयोग केला आहे; पण आता मराठा संघटना एकत्र आल्या असून मते कोणाला द्यायची याचाही संघटनाच निर्णय घेणार आहेत. दि. ९ आॅगस्ट रोजीच्या मोर्चाच्या तयारीसाठी उद्या, मंगळवारी (दि. २४) शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत, त्यानंतर प्रत्येक महाविद्यालयात जाऊन युवकांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले जाणार आहे. याशिवाय या मोर्चात रिक्षा व्यावसायिक, चारचाकी वाहने, लॉरी, शिक्षण संस्था बंद ठेवून मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येणार आहे.
या पत्रकार परिषदेस, जिल्हा युवा प्रमुख मोहनराव मालवणकर, इचलकरंजी विधानसभा प्रमुख नितीन लायकर, सुनीता पाटील, निरंजन पाटील, संजय कुडळे, सुभाष पाटील, अमोल कल्याणकर, गोरख शिंदे, राजू सावंत,मेजर सतीश पाटील, राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या कार्यकर्त्या, आदी उपस्थित होते.
सहभागी न होणाºया नेत्यांना श्रद्धांजली
क्रांतिदिनी होणाºया मोर्चामध्ये सत्तेतील लोकप्रतिनिधींनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. जे लोकप्रतिनिधी मोर्चात अगर बंदमध्ये सहभागी होणार नाहीत, त्यांना भर चौकात श्रद्धांजली वाहण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
फक्त११ जणांना कर्जे
आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे मराठा समाजातील व्यक्तींना कर्ज मिळण्यासाठी निर्माण केल्याचे भासवले जात आहे; पण राज्यातून सुमारे दहा हजार कर्ज मागणीचे अर्ज आले असताना त्यांपैकी ११५ जणांना कर्जे देण्यात आली असून त्यामध्ये मराठा समाजातील ११ जणांचाच समावेश आहे.