Maratha Reservation: कोल्हापुरात शिवाजी पुलावर रास्ता रोको; आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2022 11:56 AM2022-02-26T11:56:27+5:302022-02-26T11:56:54+5:30
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात पुन्हा एकदा मराठा समाज आक्रमक
कोल्हापूर : राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. यामुद्द्यावरून आता राज्यातील वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती हे आज पासून आरक्षण आणि मराठा समाजाच्या इतर प्रलंबित मागण्यांबाबत मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषणासाठी बसले आहेत.
संभाजीराजेंच्या या भूमिकेला राज्यातील विविध जिल्ह्यांतून समर्थन मिळत आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने आज, शनिवार पासून दसरा चौकात बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे.
दरम्यान, आंदोलकांनी आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज पुल येथे रास्ता रोको केला. या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. माजी उपमहापौर दिगंबर फराकटे यांनी शिवाजी पुलावर चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. यावरुन मराठा बांधवांनी याठिकाणी रास्ता रोको केला.
दरम्यान, राज्य शासनाने याआधीच या आंदोलनाची दखल घेतल काल, शुक्रवारी मोठा निर्णय घेतला. मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी तातडीने स्वतंत्र समर्पित मागासवर्ग आयोग गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी काल झालेल्या मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
सहसचिव दर्जाच्या विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती
मराठा समाजासाठी घेण्यात आलेल्या निर्णयांची अंमलबजावणी व शासनाच्या विविध विभागांमध्ये समन्वय साधण्यासाठी सहसचिव दर्जाच्या विशेष अधिकाऱ्याची तातडीने नियुक्ती करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. या अधिकाऱ्याच्या नियुक्तीमुळे मराठा समाजासाठी घेतलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीला गती मिळेल.
या आहेत मागण्या
- ‘सारथी’ संस्थेचे काम पूर्णपणे ठप्प असून त्यांना सगळ्या सुविधा देऊन कामकाजाला गती द्यावी.
- आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे संचालक मंडळ नेमा.
- मराठा आरक्षणानंतर नोकरी मिळाल्यांच्या नेमणुका रद्द् केल्या आहेत. त्यांन पुन्हा सेवेत घ्या.
- मराठा आरक्षणासाठी हुत्मामा झालेल्या ४० जणांच्या कुटुंबियांना सरकारी नोकरीत घ्या.
- कोपर्डी येथील प्रकरणाची सुनावणी गतीने घ्या.