Maratha Reservation : मुख्यमंत्र्यांचे बैठकीचे निमंत्रण शाहू छत्रपतींनी नाकारले, मुख्यमंत्र्यांनी छत्रपतींकडे यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 05:34 PM2018-08-01T17:34:21+5:302018-08-01T17:45:54+5:30

Maratha Reservation : शाहू छत्रपतींनी मुख्यमंत्र्यांकडे नव्हे तर मुख्यमंत्र्यांनी शाहू छत्रपतींकडे चर्चेसाठी यावे, अशी परखड भावना सकल मराठा समाजाने व्यक्त केल्याने त्यांनी बैठकीस न जाण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री चर्चा कसली करतात, निर्णय घ्यावा, असेही शाहू छत्रपती यांनी ठणकावून सांगितले.

Maratha Reservation: Shahu Chhatrapati Maharaj reject meeting with Cm devendra fadnavis | Maratha Reservation : मुख्यमंत्र्यांचे बैठकीचे निमंत्रण शाहू छत्रपतींनी नाकारले, मुख्यमंत्र्यांनी छत्रपतींकडे यावे

Maratha Reservation : मुख्यमंत्र्यांचे बैठकीचे निमंत्रण शाहू छत्रपतींनी नाकारले, मुख्यमंत्र्यांनी छत्रपतींकडे यावे

googlenewsNext
ठळक मुद्देआरक्षणाबाबत मराठा समाजातील प्रमुखांशी चर्चा प्रकृतीमुळे एन. डी. पाटील यांचा नकार, जयसिंगराव पवार यांचाही विरोध

कोल्हापूर : मराठा आरक्षणावरून निर्माण झालेला तिढा सोडविण्यासाठी  गुरुवारी सकाळी साडे दहा वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत सह्याद्री अतिथी गृहात राज्यातील मराठा समाजातील प्रमुखांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीसाठी कोल्हापूरचे शाहू छत्रपती यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी निमंत्रण दिले होते; पण शाहू छत्रपतींनी मुख्यमंत्र्यांकडे नव्हे तर मुख्यमंत्र्यांनी शाहू छत्रपतींकडे चर्चेसाठी यावे, अशी परखड भावना सकल मराठा समाजाने व्यक्त केल्याने त्यांनी बैठकीस न जाण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री चर्चा कसली करतात, निर्णय घ्यावा, असेही शाहू छत्रपती यांनी ठणकावून सांगितले.

मराठा आरक्षणासाठी संपूर्ण राज्यात आंदोलन पेटल्याने सरकारच्या पातळीवर चर्चेच्या फेऱ्या सुरू असल्यातरी सकल मराठा समाज चर्चेसाठी तयार नाही.

यासाठी मराठा समाजातील ज्येष्ठ तज्ञांशी चर्चा करण्यासाठी गुरुवारी सकाळी साडे दहा वाजता मुंबईत सह्याद्री आतिथी गृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक आयोजित केली असून, यासाठी शाहू छत्रपती,ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील, ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, ज्येष्ठ विचारवंत आ. हं. साळुंखे यांना निमंत्रित केले आहे.

याबाबत सकल मराठा समाजातील कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी बुधवारी दुपारी शाहू छत्रपती व डॉ. पवार हे दसरा चौकातील ठिय्या आंदोलन स्थळी आले. त्यांनी सर्व कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. आरक्षणाबाबत तुमचे म्हणणे जाणून घेण्यासाठी आल्याचे जयसिंगराव पवार यांनी सांगितले.

यावेळी सरकारने आतापर्यंत कसे फसवले, याचा पाढाच वाचला. इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत म्हणाले, समाजातील रोज एक तरूण आत्महत्या करत असताना, सरकार कोणत्या अहवालाची वाट पाहत आहेत. ५८ मूक मोर्चातून मागण्या दिलेल्या आहेत, मराठा समाज मागास कसा? याचे ८४ पुरावे दिले आहेत, मग मुख्यमंत्री तुमच्याशी कसली चर्चा करणार आहेत.

आरक्षणाचे जनक राजर्षि शाहू महाराजांचे वारस आहात, तुमच्या शब्दाला राज्यातच नव्हे देशात किंमत आहे, आंदोलन मोडीत काढण्यासाठी तुमचा वापर केला जात आहे, आमची विनंती आहे, तुम्ही चर्चेला जाऊ नका. सरकार फसवे आहे, मुंबईतील मोर्चात खासदार संभाजीराजे यांच्यासह मराठा नेत्यांना तोंडघशी पाडले. तसाच डाव सरकारचा दिसतो, असा आरोप वसंतराव मुळीक, हर्षल सुर्वे, दिलीप पाटील यांनी केला.

मागासलेपणाचे चार वर्षापुर्वी पुरावे देऊनही सरकार गप्प का होते, उद्रेक झाल्यानंतर पळापळी सुरू आहे. इतर मागासवर्गीय प्रवर्गात मराठ्यांचा समावेश सरकार करू शकते, असे इंद्रजीत सावंत यांनी सागिंतले. यावर ठिय्या आंदोलनाकडे कोणीही ढूकून पाहिलेले नाही, यावरून सरकारची मानसिकता कळली आहे. अशा परिस्थिती बैठकीला जाऊन काय चर्चा करायची, त्यामुळे बैठकीला जाणार नसल्याचे शाहू छत्रपती व जयसिंगराव पवार यांनी सांगितले. सरकारने आता चर्चा नव्हेतर आरक्षणाचा निर्णय घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. त्याचे स्वागत कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून केले.

संभाजीराजेंना उशिरा कळले!

मुंबईतील मोर्चा आणि सरकारकडून झालेली फसगतीने खासदार संभाजीराजे यांनी परवा सरकारसोबत बंद खोलीत नव्हे खुली चर्चा केली जाईल, असे सांगितले. त्यामुळे आपण बंद खोलीतील चर्चेला जाऊ नका, असा आग्रह कार्यकर्ते शाहू छत्रपतींना करत होते. यावर संभाजीराजेंना हे उशिरा लक्षात आले, अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली.

प्रतापसिंह जाधव यांच्यासोबत फोनवर चर्चा

शाहू महाराज छत्रपती यांनी डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याशी फोनवर चर्चा करून कार्यकर्त्यांची भावना सांगितली. सरकारबरोबर चर्चा नव्हे तर दबाव टाकण्यासाठी आपण बैठकीला जाऊया, असे म्हणणे डॉ. जाधव यांचे होते. पण आरक्षणाबाबत सरकारची इच्छा दिसत नाही, आंदोलन नरम करण्यासाठी हा प्रयत्न असल्याने आम्ही जाणार नाही, असे शाहू छत्रपती यांनी सांगितले. यावर तुम्ही जाणार नसाल तर आपणही बैठकीला जाणार नसल्याचे डॉ. जाधव यांनी सागिंतले.

चार वर्षात पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांचा फोन

देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यापासून चार वर्षात पहिल्यांदा आपणाला फोन केल्याचे शाहू छत्रपती यांनी सांगितले. यावर, महाराज आपल्या शब्दात वजन आहे, आता सरकार अडचणीत आल्याने आपला वापर करण्याची खेळी भाजप सरकारची असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.

पटेल म्हणजे मराठा नव्हे

सरकारने पटेल समाजाचे आंदोलन मोडून काढले असलेतरी मराठ्यांचे मोडणे सोपे नाही. आजच्या बैठकीला येणार नाही, असा निरोप आपण फोनव्दारे मुख्यमंत्र्यांना द्यावा, असे शाहू छत्रपती यांनी डॉ. प्रतापसिंह जाधव यांना सांगितले. शाहू छत्रपतींनीही मुख्यमंत्र्यांचे स्वियसहायकांना फोन केला.

प्रकृतीमुळे एन. डी. पाटील यांचा नकार

मुंबईतील बैठकीसाठी ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांना बुधवारी मुख्यमंत्री कार्यालय, पालकंमत्री चंद्रकांत पाटील यांच्या स्विय सहायकांसह आमदार विनायक मेटे यांचाही फोन आला. पण प्रकृती ठीक नसल्याने आपण येऊ शकत नसल्याचे प्रा. पाटील यांनी सागिंतले. पण डॉ. जयंसिंगराव पवार यांच्यासह आपणाला विमानाची व्यवस्था करतो, पण बैठकीला येण्याची विनंती करण्यात आली. आपण प्रकृतीमुळे परांवलंबी असल्याने बैठकीला बसणे ही अशक्य असल्याचे प्रा. पाटील यांनी सागिंतले.
 

Web Title: Maratha Reservation: Shahu Chhatrapati Maharaj reject meeting with Cm devendra fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.