Maratha Reservation : मुंबईतील ‘मराठा स्वाभिमान गाडी मार्च’ होणारच; सकल मराठा समाजाचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 11:02 AM2018-09-01T11:02:09+5:302018-09-01T11:05:05+5:30
पूर्वनियोजनाप्रमाणे सकल मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे दि. ४ सप्टेंबरला मुंबईत ‘मराठा स्वाभिमान गाडी मार्च’ हा चारचाकी वाहनासमवेतचा मोर्चा निघणार आहे. हा मोर्चा शांततेत, पण पूर्ण ताकदीनिशी काढण्याचा ठाम निर्धार कोल्हापुरातील सकल मराठा समाजाचे समन्वयक, बांधवांनी केला.
कोल्हापूर : पूर्वनियोजनाप्रमाणे सकल मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे दि. ४ सप्टेंबरला मुंबईत ‘मराठा स्वाभिमान गाडी मार्च’ हा चारचाकी वाहनासमवेतचा मोर्चा निघणार आहे. हा मोर्चा शांततेत, पण पूर्ण ताकदीनिशी काढण्याचा ठाम निर्धार कोल्हापुरातील सकल मराठा समाजाचे समन्वयक, बांधवांनी केला.
मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेण्याच्या मागणीबाबत जिल्ह्यातील खासदार, आमदारांनी मुख्यमंत्र्यांसमवेत केलेल्या चर्चेची माहिती सकल मराठा समाजाच्या समन्वयक, बांधवांना शासकीय विश्रामगृहातील बैठकीमध्ये शुक्रवारी दिली. त्यानंतर मुंबईतील दि. ४ सप्टेंबरच्या आंदोलनाबाबत दिशा ठरविण्यासाठी जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्या समन्वयकांची बैठक झाली.
यामध्ये नंदिनी बाभूळकर म्हणाल्या, आरक्षणासह अन्य मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी विश्वास दिला, तर आयोगाचा अहवाल येईपर्यंत थांबण्याचा विचार करता येईल. मात्र, त्यांनी विश्वास दिला नाही तर आंदोलनाची धार वाढवूया. इंद्रजित सावंत म्हणाले, आम्हाला आरक्षण कशा पद्धतीने देणार आहात, याची माहिती देण्यासाठी विशेष अधिवेशनाची आम्ही मागणी केली.
आपला स्वाभिमान जिवंत ठेवायचा असेल, तर चारचाकी वाहन मोर्चाद्वारे मुंबईत धडक देणे आवश्यक आहे. सचिन तोडकर, स्वप्निल भांदिगरे, प्रताप माने, वसंतराव मुळीक, दिलीप देसाई, आदींनी मोर्चाबाबतची भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर उपस्थित समन्वयक आणि समाजबांधवांनी हात उंचावून मुंबईतील दि. ४ सप्टेंबरचा मोर्चा काढण्याबाबतचा निर्धार व्यक्त केला.
आधी झालेल्या नियोजनाप्रमाणे मुंबईतील चारचाकी वाहन मोर्चा होणार आहे. त्याची सुरुवात दि. ४ सप्टेंबरला सकाळी साडेनऊ वाजता ऐतिहासिक दसरा चौकातून होणार आहे. अन्य १९ मागण्यांबाबत सरकारने कोल्हापुरात येऊन निवेदन करावे.
- वसंतराव मुळीक
आरक्षण देण्याबाबतची जबाबदारी घेणार का? आणि मुख्यमंत्र्यांवर तुमचा विश्वास आहे का? अशी विचारणा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना केली असता ते निरुत्तर झाले. जर, त्यांचाच मुख्यमंत्र्यांवर विश्वास नसेल, तर मग आम्ही कसा विश्वास ठेवायचा? त्यामुळे सकल मराठा समाजाच्या निर्धारानुसार शांततेत, पण ताकदीनिशी आणि स्वाभिमानाने मुंबईतील चारचाकी वाहन मोर्चा होईल.
-दिलीप देसाई
‘हम आयेंगे बार बार लगातार’
‘हम आयेंगे बार बार लगातार’ हे ब्रीदवाक्य घेऊन आमचा ‘मराठा स्वाभिमान गाडी मार्च’ मुंबईत निघणार आहे. त्यात राज्यातील समाजबांधव सहभागी आहेत. गेटवे आॅफ इंडियासमोर किमान तीन दिवस राहण्याच्या दृष्टीने समाजबांधवांनी यावे, असे आवाहन इंद्रजित सावंत यांनी सांगितले.