मराठा क्रांती मोर्चा ऐतिहासिक होईल

By admin | Published: October 6, 2016 01:32 AM2016-10-06T01:32:06+5:302016-10-06T01:32:49+5:30

‘लोकमत’ भेटीवेळी संयोजन समितीचा विश्वास : १५ आॅक्टोबरच्या मोर्चाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष

The Maratha Revolution Front will be historic | मराठा क्रांती मोर्चा ऐतिहासिक होईल

मराठा क्रांती मोर्चा ऐतिहासिक होईल

Next

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात १५ आॅक्टोबर रोजी निघणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चाबाबत झालेली प्रचंड जनजागृती, प्रबोधन आणि त्याला महिलांसह सर्व समाजांतून मिळणारा प्रतिसाद पाहता, हा मूक मोर्चा विराट होईल, यात शंकाच नाही; परंतु या ऐतिहासिक मूक मोर्चाची ‘गिनीज बुक’मध्ये नोंद होईल, असा ठाम विश्वास मराठा क्रांती मूक मोर्चाच्या संयोजन समितीच्या सदस्यांनी बुधवारी दुपारी ‘लोकमत’च्या शहर कार्यालयास भेट दिल्यानंतर व्यक्त केला.
कोल्हापूरचा मोर्चा हा इतर जिल्ह्यांपेक्षा थोडा वेगळा आहे. कोल्हापूर शहराला ऐतिहासिक परंपरा आहे. ज्यांनी देशासमोर आदर्श राज्यकारभाराचा इतिहास रचून ठेवला, अशा राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा पगडा शहरावर आणि येथील जनतेवर आहे. त्यामुळेच १५ आॅक्टोबरच्या मोर्चाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले असल्याने, हा मोर्चा अत्यंत शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध होण्याकडे आम्हा सर्व संयोजकांनी लक्ष दिल्याचे समिती सदस्यांनी सांगितले.
प्रारंभी ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांनी स्वागत करताना भूमिका मांडली. ते म्हणाले, मराठा क्रांती मोर्चाद्वारे समाजामध्ये वैचारिक मंथन मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहे. सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक गरजा ओळखून संपूर्ण समाजाला प्रगतीची दालने खुली व्हावीत म्हणून महाराष्ट्राने अनेक पावले उचलली आहेत. त्यात कोल्हापूर नेहमी आघाडीवर राहिले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या विचाराने प्रेरित झालेला कोल्हापूर जिल्हा हा नेहमीच बहुजनांचे नेतृत्व करीत आला आहे. उपेक्षितांना न्याय देण्यासाठी आरक्षण ही संकल्पनाच शाहू महाराज यांनी सर्वप्रथम मांडली. मराठा समाजाला आरक्षणही दिले होते.त्याच भूमिकेतून विविध कारणांनी उपेक्षित राहिलेल्या मराठा समाजाने आरक्षणाची मागणी केली आहे. स्वत:च्या उन्नतीसाठी एक पुढचे पाऊल अशा पद्धतीने महाराष्ट्रात मराठा क्रांती मोर्चाने समाजाला विचारप्रवृत्त केले आहे. त्यात माध्यम म्हणून ‘लोकमत’ नेहमीच आघाडीवर राहिले.
लोकमत परिवाराचा मराठा मोर्चाला नेहमीच पाठिंबा
मराठा समाजाला सर्वाधिक भेडसावणाऱ्या दोन समस्या आता अधिक तीव्र झाल्या आहेत. त्यात शेतीची कुंठीत अवस्था आणि दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध होणे यांचा समावेश आहे. शेती विषयीचे धोरण नेहमीच शेतकरी समाजाला मारक ठरले आहे. त्यात बदल आवश्यक आहे. त्याच क्षेत्रावर मराठा समाज मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे, असेही वसंत भोसले यांनी स्पष्ट केले. ‘लोकमत’ परिवाराचा या संपूर्ण परिवर्तनाच्या मराठा क्रांती मोर्चाला नेहमीच पाठिंबा राहील, असेही ते म्हणाले.
मूक मोर्चाला मिळणारा प्रतिसाद पाहता त्याची सुरुवात कोठून करायची आणि शेवट कोठे करायचा, असा आमच्यासमोर प्रश्न पडला असल्याचे सांगून सुरेश पाटील यांनी सांगितले की, मोर्चावर नियंत्रण ठेवण्याकरिता एकूण ५० संघटनांचे कार्यकर्ते गेले महिनाभर दिवसरात्र झटत आहेत. जनजागृती, प्रबोधन करण्यापासून ते मोर्चाची समाप्ती होईपर्यंतचे सर्व नियोजन पूर्ण झाले आहे. सुमारे दहा हजार कार्यकर्ते मोर्चासाठी मावळे (स्वयंसेवक) म्हणून काम करणार आहेत. मोर्चात महाविद्यालयीन तरुणी, महिला मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यामुळे मोर्चात अग्रभागी तरुण मुली असतील.
त्यानंतर महिला, पुरुष आणि शेवटी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, नेते असतील. मावळ्यांमार्फ त मोर्चात सहभागी होणाऱ्या व्यक्तींना टोप्या, झेंडे व फलक दिले जाणार
आहेत.
प्रा. जयंत पाटील यांनी सांगितले की, शहराचा आकार आणि मोर्चाला येणाऱ्यांची संख्या पाहता सर्वांनाच या मोर्चात सहभागी होता येईल का, याबाबत आम्ही साशंक आहोत. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणांहून लोक मोर्चानेच येतील आणि मु्ख्य मोर्चात सहभागी होतील. काही लोकांना केवळ या मोर्चात एका जागेवरच उभे राहून सहभागी व्हावे लागणार
आहे.
कोल्हापूरच्या मूक मोर्चाची नोंद ‘गिनीज बुक’मध्ये होईल, असा दावा करताना महेश जाधव यांनी सांगितले की, मूक मोर्चाची सगळी सूत्रे आता तरुण मुलांकडे आहेत. यामध्ये कोणीही नेता राहिलेला नाही. त्यामुळे राज्य सरकारचीही पंचाईत झाली आहे.
शहरात प्रवेश करणारे एकूण नऊ प्रमुख मार्ग असून, त्या-त्या मार्गांवरील वाहतुकीची व पार्किंगची व्यवस्था करण्यात येत आहे. इज्तेमाकरिता ज्या पद्धतीने पार्किंगची सोय करण्यात आली होती, तशीच व्यवस्था मोर्चावेळी केली असल्याची माहिती वसंत मुळीक यांनी दिली.

Web Title: The Maratha Revolution Front will be historic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.