मराठा क्रांती मोर्चाने सांगलीत गर्दीचा उच्चांक
By admin | Published: September 27, 2016 10:37 PM2016-09-27T22:37:53+5:302016-09-28T00:45:53+5:30
वाहनांचीही गर्दी : चार तास शहरातील सर्वच रस्ते बंद; दिग्गज नेत्यांच्या सभांचेही विक्रम पडले मागे
सांगली : जवाहरलाल नेहरूंपासून ते नरेंद्र मोदींपर्यंतच्या लाखो जणांच्या उपस्थितीत झालेल्या विराट सभा अनुभवलेल्या सांगलीत मंगळवारी मराठा क्रांती मोर्चाने मात्र नवा विक्रम केला. सकाळी सातपासून ते मोर्चा संपल्यानंतर सुमारे तीन ते चार तास शहरात येणारे सर्वच रस्ते जवळपास ठप्प झाले होते. त्यामुळे हा मोर्चा तसा अभूतपूर्व झाला. संयोजकांनी पंधरा लाखांहून अधिक गर्दी झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. पोलिसांनी मात्र सायंकाळपर्यंत गर्दीचा कोणताही अंदाज व्यक्त केला नव्हता.
जवाहरलाल नेहरू यांची सांगलीत १९६२ मध्ये झालेली सभा विक्रमी ठरली होती. विलिंग्डनचे मैदान त्यावेळी प्रचंड गर्दीने फुलून गेले होते. कोल्हापूर, सातारा व सोलापूर जिल्ह्यांबरोबरच कर्नाटकातूनही लोक सांगलीत आले होते. ही गर्दी जवळपास पावणेदोन ते दोन लाखाच्या आसपास असावी, असा अंदाज त्यावेळी व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर वसंतदादा पाटील यांच्या अंत्ययात्रेला मोठी गर्दी झाली होती. तसेच मिरज रस्त्यावरील क्रीडा संकुलावर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदी यांची विराट सभा झाली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या सभा, सांगलीत इंदिरा गांधी, राजीव गांधी, व्ही. पी. सिंग, बाळासाहेब ठाकरे यांच्याही गर्दीच्या सभा यापूर्वी झाल्या. मात्र या सभा, कार्यक्रमांना झालेल्या गर्दीचा आकडा दोन लाखाच्या पुढे गेला नव्हता, पण मराठा मोर्चाने सांगलीच्या गर्दीच्या इतिहासात नवा विक्रम केला.
इस्लामपूर रस्त्याने येणाऱ्यांना टोल नाक्याजवळच वाहने थांबवून चालत सांगलीत यावे लागले. मिरजेकडून येणारी बरीच वाहने मिरजेतच अडकून पडली. कोल्हापूर रस्त्याने येणाऱ्या वाहनांना शास्त्री चौकापर्यंतही येता आले नाही. त्यांना पार्किंगसाठी शंभरफुटी रस्त्याचा आधार घ्यावा लागला. विट्याकडून येणाऱ्यांना माधवनगरमध्येच वाहने थांबवावी लागली. मराठा समाजबांधवांना चार ते पाच किलोमीटरपर्यंत पायपीट करावी लागली. दुपारी एक वाजता मोर्चा संपला, मात्र वाहने रस्त्याला लागण्यासाठी चार वाजले.(प्रतिनिधी)
मी गेल्या ५५ वर्षांतील सांगलीतील जवळपास सर्वच गर्दीच्या सभा पहिल्या आहेत. माझ्या मते १९६२ ला नेहरूंच्या सभेला व वसंतदादा पाटील यांच्या अंत्ययात्रेवेळी झालेली गर्दी मोठी होती. त्यानंतरचा आजचा मोर्चा त्याच्या चौपटीहून अधिक होता. याचा अंदाज व्यक्त करणे अवघड आहे.
- बिराज साळुंखे, कामगार नेते, सांगली.