सांगलीत आज मराठा समाजाचा एल्गार
By Admin | Published: September 26, 2016 11:59 PM2016-09-26T23:59:20+5:302016-09-27T00:01:38+5:30
यंत्रणा सज्ज : मराठा क्रांती मूक मोर्चा
सांगली : कोपर्डी बलात्कारप्रकरणी आरोपींना फाशी व्हावी, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, तसेच अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करण्यात यावा, यांसह विविध मागण्यांसाठी सांगलीत आज, मंगळवारी मराठा समाजाचा मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. दक्षिण महाराष्ट्रातील हा पहिलाच मोर्चा असून, गर्दीचे जिल्ह्यातील सर्व विक्रम मोडीत काढून पंधरा लाखांवर लोक या मोर्चात सहभागी होतील, असा अंदाज संयोजकांनी व्यक्त केला आहे.
सांगलीतील या मोर्चाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील चौकापासून मार्केट यार्ड, पुष्पराज चौक, राममंदिरापर्यंत मोर्चाचा प्रमुख मार्ग आहे. सकाळी ११ वाजता मोर्चास सुरुवात होणार आहे. मोर्चात सहभागी होण्याचा क्रमही निश्चित करण्यात आला असून, त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी मोर्चाच्या प्रमुख मार्गावर दोन हजार स्वयंसेवकांची नियुक्ती केली आहे. मोर्चाच्या मार्गावर पिण्याचे पाणी, आरोग्य पथक, डॉक्टर तसेच रुग्णवाहिकेची सोय केली आहे. संपूर्ण मोर्चा मार्गावर तसेच शहरात रेडिओच्या माध्यमातून वायरलेस ध्वनिक्षेपक यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. सोमवारपासूनच ही यंत्रणा कार्यान्वित झाली.
संपूर्ण शहरातील आणि शहराबाहेरील मोर्चाचे शिस्तबद्ध नियोजन करण्यासाठी पाच हजार स्वयंसेवक सहभागी होत आहेत. त्यांना स्वतंत्र बिल्ले, टी-शर्ट देण्यात आले आहेत. सांगली जिल्ह्यासह कर्नाटक सीमेवरील गावे, कोल्हापूर जिल्ह्यातील काही गावांमधून, तसेच सोलापूर आणि सातारा जिल्ह्यांतूनही अंदाजे पंधरा लाख मराठा समाजबांधव मोर्चात सहभागी होणार आहेत. संयोजकांसह महापालिका, पोलिस, जिल्हा प्रशासनाची यंत्रणा मोर्चासाठी सज्ज झाली आहे. (प्रतिनिधी)
असा असेल सहभाग
मोर्चात अग्रभागी लहान मुली, विद्यार्थिनी, त्यानंतर महिला, महिला नेत्या, विद्यार्थी, युवक, पुरुष, राजकीय नेते, स्वच्छता कार्यकर्ते आणि सर्वांत शेवटी नियोजन कार्यकर्ते असा क्रम राहणार आहे. या क्रमाचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे.
समन्वयाची यंत्रणा
मुख्य मोर्चा मार्गावर शंभर आणि शहरात अन्यत्र पन्नास ध्वनिक्षेपक बसविण्यात आले असून, या सर्व ध्वनिक्षेपकांना रेडिओशी जोडण्यात आले आहे. एकाचवेळी शहराच्या कानाकोपऱ्यात तसेच कुपवाड, मिरजेतही सूचना व माहिती दिली जाणार आहे. स्वयंसेवकांमधील समन्वयासाठी शंभर वॉकीटॉकी देण्यात आले आहेत.
शहर भगवेमय
मराठा क्रांती मोर्चास सर्व जाती-धर्मातील संघटना, सामाजिक, राजकीय पक्ष, संघटना यांनी पाठिंबा दर्शविला आहे. सारे शहर आणि परिसर भगवेमय झाले आहे.
स्टेज तयार
सांगलीच्या राममंदिर चौकात स्टेज उभारण्यात आले आहे. तेथे मोर्चा आल्यानंतर दहा युवती स्टेजवर येतील. मराठा समाजाच्या मागण्या, भावना आणि मोर्चाचा उद्देश यावर एका युवतीचे भाषण होणार आहे. त्यानंतर पाच मुलींचा एक गट डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यास जाणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन हा गट राममंदिर चौकात परतणार असून, तेथे मोर्चाचा समारोप होईल.