मराठा विद्यार्थी वसतिगृहाला अखेर मुहूर्त सापडला ‘लोकमत’चा प्रभाव : शुक्रवारपासून प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 12:51 AM2018-08-01T00:51:55+5:302018-08-01T00:53:52+5:30
कोल्हापूर
: मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनातर्फे विचारेमाळ येथे डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृहाचा प्रारंभ शुक्रवार (दि. ३) पासून होणार आहे. पहिल्या टप्प्यात या वसतिगृहात २२ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. इमारतीचे काम पूर्ण होईल, त्याप्रमाणे उर्वरित विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निवासस्थान असलेल्या विचारेमाळ येथील इमारतीची दुरुस्ती करून वसतिगृहासाठी इमारत तयार केली आहे.या वसतिगृहातील प्रवेशासाठी जिल्हा प्रशासनाकडे ७४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यात कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूरमधील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सध्या वसतिगृहात २४ विद्यार्थ्यांसाठी निवासाच्या सुविधेचे काम पूर्ण झाले. उर्वरित काम सुरू आहे; त्यामुळे पहिल्या टप्प्यात २२ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे.
या वसतिगृहाचे व्यवस्थापन स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून केले जाणार असून त्यासाठी जिल्ह्यातील पाच नोंदणीकृत संस्थांनी अर्ज दाखल केले आहेत. या अर्जांची छाननी करून त्यापैकी एका संस्थेची निवड केली जाईल.या प्रक्रियेला विलंब झाल्यास विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून शुक्रवार (दि. ३) दुपारी चार वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या वसतिगृहाचे उद्घाटन केले जाणार आहे. उद्घाटनाच्या दिवसापासून संबंधित २२ विद्यार्थ्यांना याठिकाणी राहता येणार आहे.
शहराबाहेरील विद्यार्थ्यांना प्रवेश
या वसतिगृहातील विद्यार्थी प्रवेश, प्रारंभाबाबत अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांच्यासमवेत मंगळवारी चर्चा केली. त्यांच्या सूचनेनुसार शुक्रवारी वसतिगृहाचा प्रारंभ होणार असल्याचे सदस्य सचिव प्रशांत पट्टलवार यांनी सांगितले. ते म्हणाले, वसतिगृहासाठी ७४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यांपैकी २२ जणांची प्रवेशासाठी निवड केली आहे. खुल्या प्रवर्गातील, कुटुंबाचे उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी असणाºया आणि कोल्हापूर शहराबाहेरील विद्यार्थ्यांचा त्यात समावेश आहे. वसतिगृह व्यवस्थापनासाठी नोंदणीकृत पाच संस्थांचे अर्ज दाखल झाले आहेत. त्यांची छाननी लवकरच पूर्ण केली जाईल.
या वसतिगृहाच्या प्रारंभाला विलंब झाल्याचे वास्तव ‘लोकमत’ने रविवारच्या (२९ जुलै) अंकामध्ये ‘मराठा वसतिगृहाबाबतची पालकमंत्र्यांनी दिलेली मुदत उलटली’ या वृत्ताद्वारे मांडले होते.