खच्चीकरण होऊनही मराठ्यांनी संस्कृती जपली
By admin | Published: October 8, 2016 01:23 AM2016-10-08T01:23:48+5:302016-10-08T01:24:27+5:30
संदीप पाटील यांचे मत
कोल्हापूर : कालौघात बहुतांश भूमिहीन झालेला मराठा शेतकरी, शिकूनही अपेक्षित नोकरी व योग्य संधी मिळत नसल्याने खचलेला विशेषत: ग्रामीण भागातील तरुण अशी सद्य:स्थिती नेतृत्व करणाऱ्या मराठा समाजाची आहे. यामुळे काहीअंशी पिचलेल्या या समाजाचे मानसिक व शारीरिक खच्चीकरण झाल्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत आहे. असे असले तरी त्यांनी गुणसूत्रां (जीन्स)मुळे आपला लढवय्या स्वभाव व संस्कृती सोडलेली नाही, असे मत मराठा चळवळीतील कार्यकर्ते डॉ. संदीप पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
डॉ. संदीप पाटील म्हणाले, मराठा समाजातील मूठभर लोक पुढे गेले आहेत, हेच चित्र आतापर्यंत रंगविण्यात आले आहे; परंतु ते अर्धसत्य आहे. या समाजाची व्याप्ती फार मोठी असून, त्यातील मोठ्या प्रमाणातील संख्या हलाखीच्या लोकांची आहे. या समाजाची पार्श्वभूमी शेतीव्यवस्थेची आहे. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनच या लढवय्या मराठा समाजाकडे नेतृत्वगुण दिसताहेत. त्यांनी सर्व बारा बलुतेदारांसह अन्य जातींचे नेतृत्व करून नेहमीच मोठ्या भावाची भूमिका बजावली आहे. या समाजाने नेहमीच इतरांना मोठ्या मनाने केवळ देण्याचेच काम केले आहे; परंतु आता ती स्थिती राहिलेली नाही. त्यांच्यावरही आता काहीतरी मागण्याची वेळ आली आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काळात या समाजाला प्रथम अडचणींना सामोरे जावे लागले. दिवसेंदिवस त्याची वाटचाल भूमिहीनतेकडे होत गेली.
ते पुढे म्हणाले, फक्त भूमिहीन होण्यामुळेच हा समाज मागे पडत गेला असे नाही; तर जागतिकीकरणात व्यापारी पेठा काबीज करता येऊ न शकल्याने व त्याच्या हातात काहीच न राहिल्याने तो खऱ्या अर्थाने मागे पडला. सध्या तर अडचणींची परिसीमाच गाठली आहे. नोकरीत कुठेही संधी मिळत नसल्याने मराठा तरुण अस्वस्थ आहे.
ज्यांच्याकडे जमिनी आहेत त्या शेतकऱ्यांवरही आता आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. माणूस आत्महत्येसारखा विचार का करतो, तर त्याची मानसिकता तशी झालेली असते. मोठ्या प्रमाणात मराठा शेतकरी या दुष्टचक्रातून जात आहेत. सध्या माहिती तंत्रज्ञानाचा प्रभाव वाढत आहे; परंतु त्यामध्ये आपला समाज म्हणावा असा पुढे गेलेला दिसत नाही. याला प्रमुख कारण म्हणजे उत्पन्नाचा स्रोत नसल्याने दर्जेदार शिक्षणाकडे त्यांना जाता येत नाही. या क्षेत्रात ज्यांना संधी निर्माण झाली, त्यामध्ये काही प्रमाणातच मराठा तरुण गेले; परंतु त्यांनाही पायाभूत सुविधा मिळाल्या नाहीत. गुणवत्ता व लढवय्येपणा अजूनही कायम आहे.
मोर्चानंतर पुढे काय?
मराठा मोर्चानंतरही हा समाज एकत्र राहण्यासाठी जिल्हास्तरावर ‘सकल मराठा प्रबोधन मंच’ निर्माण केला पाहिजे. यामध्ये मराठा समाजातील विचारवंत, डॉक्टर्स, वकील, विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांचा समावेश करावा. या माध्यमातून तालुकापातळीवर वेळोवेळी संपर्क साधून समाजाशी संवाद साधला जावा.
तरुण घेताहेत मोर्चातून भविष्याचा वेध
या मोर्चाच्या निमित्ताने सर्व मराठा बांधव एकत्र आले आहेत. त्या माध्यमातून मनोधैर्य आले आहे. मोर्चाच्या माध्यमातून मराठ्यांची विशेषत: तरुणांची खदखद बाहेर पडत आहे. हा समाज शांतपणे आपल्या मागण्यांसाठी पुढे येत आहे. यातून तरुणांचे नेतृत्व बाहेर पडत असून, ते या माध्यमातून भविष्याचा वेध घेत आहेत. हा मोर्चा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी पाऊलवाट ठरेल.