मराठ्यांना सरसकट आरक्षण नको, भारत पाटणकरांचे परखड मत

By इंदुमती सूर्यवंशी | Published: December 21, 2023 05:44 PM2023-12-21T17:44:37+5:302023-12-21T17:45:11+5:30

कुणबी नोंदी असलेल्यांचाच अधिकार

Marathas don want immediate reservation says Bharat Patankar | मराठ्यांना सरसकट आरक्षण नको, भारत पाटणकरांचे परखड मत

मराठ्यांना सरसकट आरक्षण नको, भारत पाटणकरांचे परखड मत

कोल्हापूर : आपल्या देशात जातीनिहाय आरक्षण दिले जाते, मराठा समाज क्षुद्र नाही, त्यामुळे सरसकट सगळ्या मराठ्यांना कुणबी ठरवून आरक्षण देण्याची गरज नाही, कुणबी नोंदी सापडतील ते ओबीसी आहेत. त्यांना आरक्षण मिळाले पाहीजे असे परखड श्रमिक मुक्तीदलाचे ज्येष्ठ नेते डॉ. भारत पाटणकर यांनी गुरुवारी मांडले.

कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, सरसकट आणि टिकणारे आरक्षण ही बोगस चर्चा आहे. मराठ्यांना ओढून ताणून मागासलेले दाखवून आरक्षण देऊ नका. श्रमिक मुक्ती दलाच्या अधिवेशनात राज्यातील सात महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा व ठराव केले जाणार आहेत. त्यापैकी मराठा आरक्षण हा एक महत्वाचा विषय आहे.

कुणबी, माळी आणि धनगर हे तीन भाऊ आहेत. पण मराठे क्षुद्र नव्हते, कुणबी क्षुद्र आहेत, १८८१ साली जिल्ह्यात २ लाख ९९ हजार ८७१ कुणबी व ६२ हजार २८७ मराठे होते. कुणबी नोंदी असलेल्यांना आरक्षणाचा लाभ मिळाला पाहीजे पण सरसकट सगळ्या मराठ्यांना कुणबी ठरवून त्यांच्यासाठी वेगळा कायदा करण्याची, आरक्षणाची गरज नाही.

इतिहास बदलण्याचा प्रयत्न

ते म्हणाले, राज्यकर्त्यांकडून इतिहास बदलण्याचे काम सुरू आहे. त्यांना बुद्धांना हद्दपार करायचा आहे, शिवाजी महाराजांचा नवा इतिहास लिहायचा आहे, मनुस्मृती पून्हा आणायची आहे. पौराणिक कथा म्हणजे इतिहास हे बिंबवले जात आहे. शिलालेख, कागदपत्रे, तत्कालीन दस्ताऐवज त्यांच्यासाठी महत्वाचे नाही. हे असेच करत शिकलेल्या तरुणाईच्या कानात शिसे ओतले जात आहे. शाहु, फुले आ्बेडकरांचे विचार मातीमोल करून जातीव्यवस्थेची उतरंड परत आणणे म्हणून समाजाने पुन्हा गुलामीत जाण्यासारखे आहे.

भिक्षा नको पाणी द्या

ते म्हणाले, शासनाचा आनंदाचा शिधा, मोफत धान्य म्हणजे भिक्षाच आहे. शेतकऱ्यांना ही भिक्षा नको पाणी द्या, वीज द्या, रोजगाराच्या संधी द्या. पण सरकार भांडवलदारांना सवलती आणि आम्हाला भिक्षा देत आहे. म्हणजे भांडवलदारांची हमाली करा किंवा कंपन्या म्हणतील तसे गुलाम व्हा असा पर्याय ठेवला आहे.

Web Title: Marathas don want immediate reservation says Bharat Patankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.