आरक्षणासाठी मराठ्यांनी पेटवली मशाल; कोल्हापुरातून फुंकले रणशिंग

By संदीप आडनाईक | Published: October 29, 2023 02:35 PM2023-10-29T14:35:33+5:302023-10-29T14:36:10+5:30

कोल्हापूरातून एल्गार! आरक्षणासाठी साखळी उपोषण सुरू

Marathas lit torch for reservation; Trumpets blown from Kolhapur | आरक्षणासाठी मराठ्यांनी पेटवली मशाल; कोल्हापुरातून फुंकले रणशिंग

आरक्षणासाठी मराठ्यांनी पेटवली मशाल; कोल्हापुरातून फुंकले रणशिंग

कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजातर्फे रविवारी कोल्हापुरात ऐतिहासिक दसरा चौकात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर साखळी उपोषणास प्रारंभ झाला. मराठा समाजाच्या सर्व संघटनेच्या नेत्यांनी क्रांतीची मशाल पेटवून या आंदोलनाचे रणशिंग फुंकले. विश्वासघात करणाऱ्या सरकारला इशारा दिला होता, परंतु यापुढे आंदोलन तीव्र करण्याचा एल्गार मराठ्यांनी पुकारला आहे. या आंदोलनात मराठा समाजातील महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.

दसरा चौकात शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर मराठा समाजातील सर्व संघटनांनी रविवारी सकाळी ९.३० वाजल्यापासून साखळी उपोषणास प्रारंभ केला. यासाठी घातलेल्या भव्य मंडपात मराठा समाजातील सर्व नेते आणि कार्यकर्ते उपोषणास बसले होते. आंदोलनास प्रारंभ करण्यापूर्वी नेत्यांनी शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घातला. क्रांतीची मशाल प्रज्वलित करुन साखळी उपोषणास प्रारंभ झाला.

वसंतराव मुळीक म्हणाले, मराठा आरक्षणाच्या क्रांतीची मशाल पेटली आहे. मराठ्यांची घोडदौड सुरू झाली असून मराठ्यांचा गनिमी कावा शासनाला कळणार नाही. तातडीने आरक्षणाचा निर्णय घ्यावा, अन्यथा हा वणवा पेटणार आहे.

ॲड. बाबा इंदुलकर म्हणाले, शासनाने वेळोवेळी समाजाचा विश्वासघात केला. शासनाचा निषेध म्हणून आम्ही मशाल पेटवली आहे. याची ठिणगी राज्यभर पसरल्याशिवाय राहणार नाही. या पेटत्या मशालीत शासनाची राखरांगोळी कधी होईल ते समजणार नाही. मराठ्यांना कोर्टामध्ये टिकणारे आरक्षण मिळवून देणार, शासनाने वेळेत जागे व्हावे असा इशारा त्यांनी दिला. मुख्यमंत्री अंधारातून आले आणि पळून गेले हा आरक्षणाचा वणवा पेटला आहे, असे ते म्हणाले.

चंद्रकांत पाटील म्हणाले, गेले आठ महिने शासन केवळ आश्वासन देत आहे. आता विश्वास राहिलेला नाही. जरांगे पाटील हे मरणाच्या दारात आहेत, तरीसुद्धा शासनाला जाग येत नाही. लोकप्रतिनिधींना कोल्हापूर शहर बंदी केलेली आहे, आरक्षण घेतल्याशिवाय आता गप्प बसणार नाही. 

रुपेश पाटील म्हणाले, आरक्षण देतो म्हणणे आणि प्रत्यक्षात देणे यामध्ये फरक आहे. नेत्यांचा दिखाऊपणा सुरू आहे. मराठा कुणबीच आहे, कुणबी म्हणूनच आम्ही जगत आहे. आमची जात कुणबी आणि धर्म मराठा आहे. आता केवळ विरोध सुरू आहे, उद्या त्यांच्या गाड्या फोडल्या जातील असा इशारा त्यांनी दिला. सुभाष जाधव म्हणाले, जरांगे पाटील यांचे उपोषण महाराष्ट्र वाया जाऊ देणार नाही, प्रसंगी प्राणाची आहुती देऊ.

या आंदोलनात सकल मराठा समाजाचे विजय देवणे, दिलीप देसाई, आर. के. पोवार, ॲड. सुरेश कुऱ्हाडे, बाबा पार्टे, मोहन सुर्वे, शशिकांत पाटील, ईश्वर परमार, संजय जाधव, काका जाधव, दुर्गेश लिंग्रस, प्रसाद जाधव, कमलाकर जगदाळे, शाहीर दिलीप सावंत, उदय लाड, अनुप पाटील, अमर निंबाळकर, संजय पवार, दिनेश कुकडोळकर, विजय घाटगे निंबाळकर, दीपक निंबाळकर, जयसिंग भोसले, बाळासाहेब जितकर, संजय काटकर, अजित काटकर, चंद्रकांत जाधव, सागर धनवडे, किरण पडवळ, प्रा. अनिल घाटगे, संपत पाटील, सुरेश पाटील, युवराज उलपे, सुनीता पाटील, सुधा सरनाईक, रेखा पाटील, अंजली जाधव, बबिता जाधव, रुपाली बरगे, मालती दुर्गुळे, रेश्मा पवार, भारती पोवार, सरलाताई पाटील, अनिता टिपुगडे, राजशेखर तंबाखे, दिलीप भारंडे, शंकर शेळके, प्रकाश हेडगे, किशोर खानविलकर, सुनील कानुरकर, उत्तम वरुटे, संभाजी इंगळे, अरुण यादव, दीपक मुळीक, रघुनाथ नढाळे, संपतराव चव्हाण पाटील, प्रसन्न शिंदे, यांच्यासह मराठा समाजातील सर्व संघटना आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. पोलिसांचा दसरा चौकात कडक बंदोबस्त होता.

यांनी दिला पाठिंबा

लमाण बंजारा समाज विकास महासंघाचे रामचंद्र पवार, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेट्ये, मराठा सेवा संघाचे अधिकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुरेश पाटील, काँग्रेसचे माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांच्यासह काँग्रेसच्या शिष्टमंडळाने या आंदोलनास पाठिंबा दिला. दरम्यान,  कोल्हापूर शहरात विविध भागातही या आंदोलनाला पाठिंबा देण्यात येत आहे. मराठा आरक्षण मिळावे यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात घातलेल्या मंडपात राजेंद्र तोरस्कर यांचे तीन दिवसांपासून चक्री उपोषण आंदोलन सुरू आहे.

Web Title: Marathas lit torch for reservation; Trumpets blown from Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.