मराठी चित्रपट महामंडळातर्फे विजय चव्हाण, मास्टर आबू यांना श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 12:10 PM2018-09-01T12:10:52+5:302018-09-01T12:14:32+5:30
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे अभिनेते विजय चव्हाण, मास्टर आबू वंटमुरीकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानिमित्त आयोजित शोकसभेत मान्यवरांनी या कलाकारांच्या आठवणींना उजाळा दिला.
कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे अभिनेते विजय चव्हाण, मास्टर आबू वंटमुरीकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानिमित्त आयोजित शोकसभेत मान्यवरांनी या कलाकारांच्या आठवणींना उजाळा दिला.
चित्रपट महामंडळाच्या मुख्य कार्यालयात झालेल्या या शोकसभेस अध्यक्ष मेघराज राजेभोसले, अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांच्यासह महामंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी मेघराज राजेभोसले म्हणाले, अभिनेते चव्हाण यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीमध्ये पोकळी निर्माण झाली आहे. चव्हाण हे शेवटपर्यंत उत्साहाने कार्यरत अभिनेते राहिले. कलाकारांच्या अडचणी सोडविण्यासाठी ते सतत प्रयत्नशील होते. कलाकारांना मान मिळावा, अशी त्यांची कायम धारणा होती. मास्टर आबूंचा आमच्या कार्यकारिणीला कायम पाठिंबा राहिला आहे.
भालचंद्र कुलकर्णी म्हणाले, अभिनेते चव्हाण आणि मास्टर आबू दोघेही हरहुन्नरी कलाकार होते. आबू यांच्यातील माणूसपण मला भावले. यशवंत भालकर म्हणाले, कलाकार त्यांच्या मृत्यूनंतरही पडद्यावर राहतात. दोघांचेही चित्रपट क्षेत्रातील योगदान खूप मोठे आहे.
यावेळी हेमसुवर्णा मिरजकर, आकाराम पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. रवींद्र बोरगावकर यांनी आभार मानले. यावेळी मिलिंद अष्टेकर, अनुपम मुंगळे, अर्जुन नलवडे, धनाजी यमकर, इम्तियाज बारगीर, रणजित जाधव, सुरेंद्र पन्हाळकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.