मराठी नाट्य परिषदेला राजकारणाची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 05:30 PM2021-03-27T17:30:32+5:302021-03-27T17:31:59+5:30
Natak Politics Kolhapur- संपूर्ण जगाला कोरोनाची लागण झालेली असताना इकडे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेला मात्र राजकारणाची लागण झाली आहे. परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांना मनमानी कारभाराच्या कारणास्तव कार्यकारिणीने पदच्युत केल्यानंतर कोर्टकचेऱ्या सुरू आहे. त्यात रंगभूमी दिनानिमित्त आयोजित शनिवारची सभा रद्द करण्यात आल्याने नियामक मंडळ सदस्यांनी कांबळी व प्रमुख कार्यवाह शरद पोंक्षे यांचा जाहीर निषेध केला आहे.
कोल्हापूर : संपूर्ण जगाला कोरोनाची लागण झालेली असताना इकडे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेला मात्र राजकारणाची लागण झाली आहे. परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांना मनमानी कारभाराच्या कारणास्तव कार्यकारिणीने पदच्युत केल्यानंतर कोर्टकचेऱ्या सुरू आहे. त्यात रंगभूमी दिनानिमित्त आयोजित शनिवारची सभा रद्द करण्यात आल्याने नियामक मंडळ सदस्यांनी कांबळी व प्रमुख कार्यवाह शरद पोंक्षे यांचा जाहीर निषेध केला आहे.
मनमानी कारभार, मर्जीतल्यांनाचा परिषदेतर्फे अर्थसहाय्य, कार्यकारिणीला विश्वासात न घेणे या कारणांवरुन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या १८ फेब्रुवारीच्या नियामक मंडळ सभेत अध्यक्ष प्रसाद कांबळी यांना पदच्युत करण्यात आले. त्यांच्या जागी नरेश गडेकर यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र कांबळी यांनी न्यायालयात दाद मागितली जो अर्ज फेटाळण्यात आला.
या कालावधीत प्रमुख कार्यवाह शरद पोंक्षे यांनी परिषदेच्या लेटरहेडवर विश्वस्तांना मनाहानीकारक पत्र पाठवले आहे. राज्यातील नाट्यगृह सुरू झाली असताना मराठी रंगभूमीच्या मध्यवर्ती संघटनेचे यशवंत नाट्य संकुल फायरची परवानगी नाही असे सांगून बंद ठेवले आहे. असे असेल तर अडीच तीन वर्षात फायरचे ना हरकत प्रमाणपत्र न घेता नाट्यसंकुल कसे चालवले हा प्रश्न आहे.
नियामक मंडळ सदस्यांनी घटनेप्रमाणे मागणी करूनही प्रमुख कार्यवाह शरद पोंक्षे यांनी सभा ठेवण्यास टाळाटाळ केली. मात्र कांबळी यांच्या विरोधात निकाल गेल्याने पोंक्षे यांनी १७ फेब्रुवारीला परिषदेची सभा २७ मार्च रोजी होईल असे जाहीर केले. ही सभा हंगामी अध्यक्ष नरेश गडेकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार होतील. ज्यात आधीच्या सभेच्या निर्णयांची अंमलबजावणी होणार होती. या कारणास्तव पोंक्षे यांनी शनिवारची सभा कोरोनाचे कारण सांगून रद्द केली. या प्रकारांमुळे नियामक मंडळाच्या सदस्यांनी कांबळी व पोंक्षे यांचा जाहीर निषेध केला आहे.