मराठी विज्ञान संमेलन यावर्षी सांगलीत होणार
By admin | Published: February 27, 2017 11:37 PM2017-02-27T23:37:27+5:302017-02-27T23:37:27+5:30
परिषदेकडून मान्यता : विज्ञान प्रबोधिनीच्या प्रयत्नांना यश; विविध संस्थांकडून सांगलीत विज्ञानविषयक उपक्रम
अविनाश कोळी ल्ल सांगली
मराठीतून विज्ञानप्रसार करण्यासाठी गेल्या ३७ वर्षांपासून कार्यरत असलेल्या सांगलीतील विज्ञान प्रबोधिनीला अखिल भारतीय मराठी विज्ञान संमेलन भरविण्यास यंदा मान्यता मिळाली आहे. पंचवीस वर्षांनंतर सांगलीत हे संमेलन होत असून, शालेय विद्यार्थी, शिक्षक आणि विज्ञानप्रेमींसाठी यंदाचे संमेलन नवी पर्वणी ठरणार आहे.
सांगलीत १९८० पासून मराठी विज्ञान प्रबोधिनी कार्यरत आहे. विविध उपक्रमांतून विज्ञान प्रसाराचे व समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याचे काम संस्था करीत आहे. डॉक्टर्स, प्राध्यापक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते असे सुमारे २०० कार्यकर्ते संस्थेचे आजीव सभासद आहेत. १९८१ ला अखिल भारतीय मराठी विज्ञान संमेलन संस्थेने सांगली येथे आयोजित केले होते. त्यानंतर १९९२ ला राजारामबापू ज्ञान प्रबोधिनीच्या सहकार्याने साखराळे येथे संस्थेने अखिल भारतीय मराठी विज्ञान संमेलन घेतले होते. त्यानंतर पंचवीस वर्षांनी पुन्हा हा मान सांगलीला मिळाला आहे. पुण्यातील मराठी विज्ञान परिषदेशी ही संस्था संलग्न आहे. परिषदेकडे याबाबत प्रबोधिनीच्या पदाधिकाऱ्यांचा पाठपुरावा सुरू होता. परिषदेचे यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष असल्याने या वर्षातील संमेलन सांगलीत व्हावे, अशी प्रबोधिनीची इच्छा होती. तसा प्रस्ताव देण्यात आला होता. त्यानुसार १७ ते १८ डिसेंबर या कालावधित हे संमेलन सांगलीत भरणार आहे. संमेलनाचे ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाही. परिषदेतर्फे दरवर्षी विभागीय तसेच अखिल भारतीय मराठी विज्ञान संमेलने भरवली जातात. या संमेलनामधून विज्ञानविषयक नवी माहिती मिळते. विविध वैज्ञानिकांचे मार्गदर्शन संमेलनातून मिळत असते. त्यामुळे या संमेलनाला वेगळे महत्त्व आहे.
प्रबोधिनीने म्हैसाळ येथे आकाशवाणीच्या मदतीने ग्रामीण विज्ञान संमेलन, तर सांगलीतील इतर संस्थांच्या मदतीने फिरते तारांगण, विज्ञान प्रदर्शन, आकाश दर्शन, व्याख्याने, फिल्म, स्लाईड शो, विज्ञानसहली असे कार्यक्रम राबविले जातात. सांगलीतील राणी सरस्वती कन्या शाळेत विज्ञान मंडळाच्या माध्यमातूनही विविध उपक्रम राबविले जातात. अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सांगलीत मराठीतून विज्ञानाची चळवळ अधिक व्यापक बनली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनही विज्ञान पोहचविण्यात सांगली आघाडीवर आहे.
विज्ञान प्रसारात योगदान देणाऱ्या सांगलीतील महत्त्वाच्या संस्था
विज्ञान प्रबोधिनी, ज्ञानदीप फाऊंडेशन यांसह सांगलीतील भारत ज्ञान-विज्ञान समुदाय ही संघटनाही याच चळवळीचा भाग असून, १९९६-९७ पासून कार्यरत आहे. अध्यक्ष शंकर शेलार, संजय कुंभार आणि शंकर पाटील यांनी, विज्ञानवादी दृष्टिकोन वाढीस लागावा म्हणून प्रयत्न चालविले आहेत. दुर्बिणीद्वारे आकाश निरीक्षण, स्लाईड शो, जैवविविधतेचा प्रत्यक्ष अभ्यास अशा विविध स्तरावर त्यांचे काम सुरू आहे. सांगलीतील विज्ञान प्रबोधिनीचे अध्यक्षपद प्रा. म. वा. जोगळेकर, वि. ह. केळकर, डॉ. विजयकुमार शहा, डॉ. य. शं. तोरो, डॉ. रवींद्र व्होरा, डॉ. सु. वि. रानडे, गो. पां. कंटक आदींनी भूषविले असून, आता तानाजीराव मोरे अध्यक्ष असून, कार्यवाह म्हणून अरविंद यादव काम पाहत आहेत.