मराठीचा गौरव घराघरांतून केला जावा :डॉ. डी.टी. शिर्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 06:08 PM2021-02-27T18:08:28+5:302021-02-27T18:09:55+5:30
literature Kolhapur- मराठी ही केवळ भाषा नाही, तर आपले साहित्य आणि संस्कृती आहे, तिला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवायचे असेल, तिचा गौरव करायचा असेल, तर त्याची सुरुवात घराघरांतून व्हायला हवी. भलेही विद्यार्थी इंग्रजी माध्यमात शिकत असेल; पण त्याची या साहित्यातील विपुल संपदेशी असलेली नाळ तुटता कामा नये, यासाठी पालकांनी प्रयत्न करावेत, असे मत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी व्यक्त केले.
कोल्हापूर : मराठी ही केवळ भाषा नाही, तर आपले साहित्य आणि संस्कृती आहे, तिला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवायचे असेल, तिचा गौरव करायचा असेल, तर त्याची सुरुवात घराघरांतून व्हायला हवी. भलेही विद्यार्थी इंग्रजी माध्यमात शिकत असेल; पण त्याची या साहित्यातील विपुल संपदेशी असलेली नाळ तुटता कामा नये, यासाठी पालकांनी प्रयत्न करावेत, असे मत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी व्यक्त केले.
दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने शनिवारी झालेल्या ग्रंथ पुरस्कार प्रदान समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी सभेचे अध्यक्ष डॉ. विजय चोरमारे, वि.द. कदम, भीमराव धुळुबुळू, गौरी भोगले, दि.बा. पाटील आदींची उपस्थिती होती.
यावेळी ज्येष्ठ कवी अशोक भोईटे, साहित्यिक माधव कामत, विजय तेंडुलकर राज्य वाङ्मय पुरस्कारप्राप्त अनुप जत्राटकर, महात्मा ज्योतीराव फुले राज्य वाङ्मय पुरस्कारप्राप्त डॉ. व्ही.एन. शिंदे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
शिर्के म्हणाले, वाचन संस्कृती कमी होत चालल्याची टीका होत असली तरी मला असे वाटत नाही. आजची नवी पिढी मोठ्या प्रमाणात साहित्य निर्मिती करत असून झपाटून लेखन करत आहे. शिवाजी विद्यापीठाच्या ग्रंथालयात कोणत्या प्रकारचे साहित्य असावे, याची शिफारस अभ्यास मंडळाने करावी, असे झाल्यास विद्यार्थ्यांपर्यंत दर्जेदार साहित्य पोहोचवता येईल.
यावेळी अशोक भोईटे यांनी कविता सादर केली.
कार्यक्रमात डॉ. सतीश कुमार पाटील, बजरंग देशमुख, वासंती मेरू, डॉ. अरुण शिंदे, डॉ. सुप्रिया आवारे, चंद्रशेखर कांबळे, वर्षा चौगुले यांना दक्षिण महाराष्ट्र साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बाळासाहेब पाटील, स्वाती शिंदे-पवार, जगजित महावंश, मंगेश मंत्री, विठ्ठल सदामते, लवकुमार मुळे, सुनील देसाई, गौतम कांबळे, उमेश सूर्यवंशी, विश्वास सुतार यांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. विनोद कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यवाह गोविंद पाटील यांनी आभार मानले.