शिनोळीत झळकला ‘मराठी टायगर्स’

By admin | Published: February 6, 2016 12:19 AM2016-02-06T00:19:34+5:302016-02-06T00:20:00+5:30

शिवसैनिक, सीमाबांधवांची मोठी उपस्थिती : कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून रोज एका खेळाची परवानगी

Marathi Tigers in Shinolat Jhalakal | शिनोळीत झळकला ‘मराठी टायगर्स’

शिनोळीत झळकला ‘मराठी टायगर्स’

Next

चंदगड : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर आधारित व येळ्ळूरसह संपूर्ण विभागातील वास्तव चित्रण मांडण्यात आलेला ‘मराठी टायगर्स’ या चित्रपटाचे प्रदर्शन बेळगाव जिल्हाधिकारी यांनी सूडबुद्धीने उत्तर कर्नाटकात थांबविले. शिनोळी (ता. चंदगड) येथेही या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवावे या हेतूने बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी यांना कायदा व सुव्यवस्थेच्या नावाखाली हा चित्रपट प्रदर्शित करू नये, अशी मागणी केली होती. पण, सीमावासीय व शिवसैनिकांच्या भावना लक्षात घेऊन कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने या चित्रपटाच्या प्रदर्शनाला अखेर परवानगी दिली. मोठ्या शिवमय वातावरणात डॉ. अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत या चित्रपटाचे प्रदर्शन शुक्रवारी शिनोळीत करण्यात आले.
बेळगावमधील येळ्ळूर येथील जनतेवर कर्नाटक सरकारने केलेला अत्याचार, निष्पाप तरुणांवर खोट्या केसेस दाखल करून त्यांना कोर्टवाऱ्या करायला लावल्या. याचे चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे. चित्रपटात केलेल्या चित्रणाद्वारे कर्नाटक पोलिसांचा अत्याचार जनतेसमोर येईल, या भीतीपोटी कर्नाटक शासनाने या चित्रपट प्रदर्शनावर बंदी आणली. पण, सीमाभागातील मराठी माणसांवरील अन्याय जनतेसमोर यावा, या हेतूने शिवसेनेने हा चित्रपट शिनोळी येथे प्रदर्शित केला. शिनोळी येथील ग्रामपंचायतीने हा चित्रपट प्रदर्शित व्हावा म्हणून सर्वतोपरी सहकार्य केले.
दरम्यान, गुरुवारी (दि.४) चंदगडचे तहसीलदार आप्पासाहेब समींदर यांनी शिनोळीपासून बेळगाव हद्द जवळ असल्याने शांतता व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. यामुळे या चित्रपटाला परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे चंदगड तालुक्यासह सीमाभागात त्याचे तीव्र पडसाद पसरले.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, प्रा. सुनील शिंत्रे, संग्राम कुपेकर, प्रभाकर खांडेकर, आदींनी प्रशासनाने परवानगी नाकारली तरी शिवसेना या चित्रपटाचे प्रदर्शन करणार या मुद्द्यावर ठाम होती. त्यामुळे संभाव्य धोका ओळखून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना परवानगी देण्यास भाग पाडले. त्यामुळे शुक्रवारी दुपारी १.३० वाजता या चित्रपटाचे प्रदर्शन झाले.
चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये कोल्हे म्हणाले, कर्नाटक सरकारने आजपर्यंत मराठी बांधवांची मुस्कटदाबी केली आहे. कर्नाटकात चित्रपट प्रदर्शित होऊ नये म्हणून सरकारने प्रयत्न केले. पण, मराठी बांधव व शिवसैनिक यांच्या जनरेट्यामुळे हा चित्रपट शिनोळीत प्रदर्शित झालाच. भाषिक वाद मिटवा, अशी भूमिका या चित्रपटात मांडली आहे.
यावेळी आमदार संध्यादेवी कुपेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांची यावेळी भाषणे झाली.
महाराष्ट्र एकीकरण समितीचे खानापूरचे आमदार अरविंद पाटील यांनी कर्नाटक सरकारने गेली ६० वर्षे मराठी बांधवांवर अत्यावर चालविला आहे. मराठी बांधवांची ही व्यथा डॉ. कोल्हे यांनी या चित्रपटातून मांडली आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारने या चित्रपटावर बंदी आणली आहे. मराठी बांधवांची गळचेपी केली आहे, पण महाराष्ट्रातील मराठी बांधवांनी शिनोळी येथे हा चित्रपट प्रदर्शित करून आम्हाला मोठा दिलासा दिला आहे. समस्या मराठी बांधवांसह आमदार-खासदारांनी हा चित्रपट पहावा आणि सीमावासीयांचा आवाज विधानसभा व लोकसभेत आणखी बुलंद करावा, अशी प्रतिक्रिया
दिली.
यावेळी आमदार संध्यादेवी कुपेकर, बेळगाव जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, बंडू केरवाडकर, संपर्कप्रमुख अरविंद नागनुरी, सचिन गोरूले, दिलीप बेळूरकर, महादेव गावडे, सरपंच नम्रता पाटील, आदींसह शिवसैनिक, सीमाबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

तीन हजार
प्रेक्षकांची उपस्थिती
चित्रपट कक्षात (टुरिंग टॉकीची) ५०० प्रेक्षकांची क्षमता आहे. पण, आजच्या दिवशी चित्रपट पाहण्यासाठी ३ हजारांहून अधिक प्रेक्षकांनी उपस्थिती
लावली होती.
त्यामुळे अनेकांना आसने न मिळाल्याने तब्बल अडीच तास उभा राहून हा चित्रपट पाहिला.


घोषणाबाजीने परिसर दणाणला
‘बेळगाव, बिदर, भालकी, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’, ‘महाराष्ट्र एकीकरण समितीचा विजय असो,’ ‘आला रे आला शिवसेनेचा वाघ आला,’ ‘कर्नाटक शासनाचा धिक्कार असो’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांची महाराष्ट्र राज्य सीमेपासून उघड्या जीपमधून मिरवणूक काढण्यात आली.


प्रवाशांचे हाल
मराठी टायगर्स चित्रपट शिनोळीत प्रदर्शित झाला. त्यामुळे अधिक वाद उफाळून येईल या शक्यतेने महाराष्ट्र राज्य परिवहन राज्य मंडळाची बससेवा शिनोळीपर्यंत, तर कर्नाटकातील बससेवा बाचीपर्यंत सुरू होती. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.

Web Title: Marathi Tigers in Shinolat Jhalakal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.