‘एकीकरण’मधील फुटीमुळे मराठी उमेदवारांतच लढती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 12:55 AM2018-04-27T00:55:56+5:302018-04-27T00:55:56+5:30
बेळगाव : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज, शुक्रवारी शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यातील मराठी माणसांचा केंद्रबिंदू असलेल्या बेळगाव दक्षिण, बेळगाव उत्तर, बेळगाव ग्रामीण, खानापूर या चार मतदारसंघांत एकीचा घोळ कायम आहे. त्यामुळे येथे मराठी विरुद्ध मराठी लढती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये पडलेल्या उभ्या फुटीमुळे सीमाभागात मराठी विरुद्ध मराठी असे वातावरण तयार झाले आहे. मराठीवर हक्क सांगणाऱ्या चार मतदारसंघांतील या फुटीचा फायदा राष्ट्रीय पक्षांना होणार आहे. समितीने सर्वानुमते प्रत्येक मतदारसंघात एकच उमेदवार देणे गरजेचे होते, पण मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती आणि बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समिती असा घोळ झाल्याने तसेच सर्वत्र एकाधिकारशाही झाल्याने उमेदवारांची संख्या कमी करता आलेली नाही. शहर म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी की किरण ठाकूर हा जुना वाद आहे. दीपक दळवी अध्यक्ष असलेल्या मध्यवर्तीस आपण मानत नाही. पहिल्यांदा मध्यवर्ती बरखास्त करून घटक समित्यांना अधिकार द्या ही मागणी किरण ठाकूर यांनी लावून धरली आहे.
बेळगाव उत्तर मतदारसंघामध्ये आमदार संभाजी पाटील यांनी डरकाळी फोडली असल्याने राष्ट्रीय पक्ष हादरले आहेत. ही जमेची बाजू असली तरी ठाकूर गटाने तेथे बाळासाहेब काकतकर यांना रिंगणात उतरवले आहे.
‘बेळगाव दक्षिण’मध्ये मध्यवर्तीच्या प्रकाश मरगाळे यांची उमेदवारी निश्चित केली असताना ठाकूर गटाने किरण सायनाक यांना पुढे केले आहे. ‘बेळगाव ग्रामीण’मध्ये मध्यवर्तीचे मनोहर किणेकर विरुद्ध ठाकूर गटाचे चारजण रिंगणात आहेत.
म. ए. समितीच्या दोन्ही गटांत एकी व्हावी यासाठी युवक कार्यकर्त्यांची संघटना व कै. सुरेश हुंदरे स्मृती मंचच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. एकीसाठी महाराष्ट्रातून प्रयत्न व्हावेत, अशी मागणी केली जात
आहे.
समिती विरुद्ध समितीतील संभाव्य लढती
बेळगाव दक्षिण- किरण सायनाक विरुद्ध प्रकाश मरगाळे
बेळगाव उत्तर- संभाजी पाटील विरुद्ध बाळासाहेब काकतकर
बेळगाव ग्रामीण- मनोहर किणेकर विरुद्ध मोहन बेळगुंदकर
खानापूर - अरविंद पाटील विरुद्ध विलास बेळगावकर