शिरोलीत मार्बल मार्केट, वाहनांची शोरुम बंद राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:24 AM2021-04-09T04:24:28+5:302021-04-09T04:24:28+5:30
शिरोली : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शिरोलीमधील मार्बल मार्केट, चारचाकी व दुचाकी गाड्यांची शोरुम, आठवडा बाजार बंद राहणार आहे ...
शिरोली : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शिरोलीमधील मार्बल मार्केट, चारचाकी व दुचाकी गाड्यांची शोरुम, आठवडा बाजार बंद राहणार आहे तर गावातील सर्व दुकाने सकाळी दहा ते सायंकाळी पाच यावेळेत सुरू ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायत बैठकीत घेण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच शशिकांत खवरे होते तर सहाय्यक पोलीस निरीक्षक आंबले या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी ग्रामविकास अधिकारी भोगम व तलाठी नीलेश चौगुले यांनी अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू ठेवण्यात येतील, असे सांगितले. तर मार्बल मार्केट, चारचाकी व दुचाकी गाड्यांची शोरुम, आठवडा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, इलेक्ट्रॉनिक, ज्वेलर्स, केश कर्तनालय, मोबाईल व्यावसायिकांनी याला विरोध केला. आमचा व आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असाल तर आम्ही दुकाने बंद ठेवतो अन्यथा आम्ही दुकाने सुरू ठेवणार, असा पवित्रा त्यांनी घेतला. त्यामुळे सरपंच शशिकांत खवरे यांनी गावातील सर्व दुकाने सकाळी दहा ते सायंकाळी पाच यावेळेत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.
यावेळी उपसरपंच सुरेश यादव, ग्रामपंचायत सदस्य बाजीराव पाटील, प्रकाश कौंदाडे, बाबासाहेब कांबळे, उत्तम पाटील, दीपक यादव, तंटामुक्त अध्यक्ष सतीश पाटील, भाजप तालुकाध्यक्ष राजेश पाटील, मंडल अधिकारी बी. एल. जाधव यांच्यासह व्यावसायिक उपस्थित होते.
चौकट:
गावातील ४५ वर्षांवरील प्रत्येक व्यापाऱ्याने व त्यांच्या घरातील सदस्यांनी ११ एप्रिलपर्यंत कोरोना लस घेऊन त्याची नोंद ग्रामपंचायतीमध्ये करावी. जे व्यावसायिक लस घेणार नाहीत त्यांचे व्यवसाय बंद करण्यात येतील, असा इशारा ग्रामविकास अधिकारी भोगम यांनी दिला.