तरुणास मारहाण करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी मोर्चा, जयसिंगपूर पोलिस ठाण्यासमोरच आंदोलकांचा ठिय्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 12:29 PM2023-04-18T12:29:02+5:302023-04-18T12:29:24+5:30
डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीदिवशी तरुणास जयसिंगपूर पोलिसांनीच मारहाण केल्याचा आरोप
जयसिंगपूर : निमशिरगाव (ता. शिरोळ) येथील सिद्धांत धनवडे या तरुणास डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीदिवशी जयसिंगपूर पोलिसांनीच मारहाण केली, असा आरोप करीत शिरोळ तालुक्यातील दलित संघटनांच्या वतीने सोमवारी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक रणजित पाटील यांच्यासह अन्य पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी पोलिस ठाण्याच्या आवारात ठिय्या आंदोलन केले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
याबाबत अधिक माहिती अशी, शुक्रवारी (दि. १४) निमशिरगाव येथे दोन तरुणांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जमावाला पांगवून शांततेचे आवाहन केले होते. यावेळी जयसिंगपूर पोलिस ठाण्याचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक रणजित पाटील यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी सिद्धांत धनवडे याला मारहाण केली. त्यामुळे तो बेपत्ता झाला आहे, असा आरोप करीत शिरोळ तालुक्यातील दलित संघटनांच्या वतीने जयसिंगपूर पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला होता.
यावेळी माजी समाजकल्याण सभापती स्वाती सासणे म्हणाल्या, पोलिसांनी एकतर्फी कारवाई करत तरुणाला मारहाण केली आहे. एकीकडे अवैध धंदे जोमात सुरू असताना त्यावर कारवाई होत नाही. त्यामुळे पोलिस अधिकारी पाटील यांच्यासह पोलिस कर्मचारी विजय पाटील, अमोल अवघडे या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून निलंबित करावे, अशी मागणी केली. दरम्यान, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.
यावेळी बनाबाई कांबळे, अनिल लोंढे, प्रदीप लोंढे, आदम मुजावर, ईश्वर धनवडे, सर्जेराव कांबळे, अभिजित आलासकर, विश्वास शिंगे, अमित वाघवेकर, संजय शिंदे, संदीप बिरणगे, सुनील कांबळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
आंदोलकांनी सपोनि. रणजित पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. हा विषय जिल्हा पोलिस प्रमुख यांच्या स्तरावरील आहे. - रामेश्वर वैंजने, पोलिस उपअधीक्षक