शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात येत्या मंगळवारी ‘घेरा डालो.. डेरा डालो’ मोर्चा
By राजाराम लोंढे | Published: June 14, 2024 01:37 PM2024-06-14T13:37:28+5:302024-06-14T13:38:17+5:30
सत्ताधीशांचे सुलतानी संकट परतवून लावण्यासाठी एक व्हा: संजय घाटगे यांचे आवाहन
कोल्हापूर : देवाच्या आडून शक्तीपीठ महामार्गाचा घाट घातला असून धनदांडग्यांना पोसण्यासाठी चालवलेला हा उद्योग आहे. सत्ताधीशांनी शेतकऱ्यांवर लादलेले हे सुलतानी संकट परतावून लावण्यासाठी मोर्चा मध्ये कुटूंबासह सहभागी व्हा, असे आवाहन माजी आमदार संजय घाटगे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केले. मंगळवारी (दि. १८) दसरा चौकातून ‘घेरा डालो डेरा डालो’ मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
संजय घाटगे म्हणाले, अकरा जिल्ह्यातील हजारो हेक्टर जमिनी, त्यातील विहीरी, तलाव, पाणी पुरवठा योजना उध्दवस्त होणार आहेत. देवाच्या नावाखाली धनदांडग्यांना पोसून त्यातून माया गोळा करण्याचा उद्योग सुरु आहे. अध्यादेश मागे घेतल्याशिवाय आता थांबणार नाही.
शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे म्हणाले, सत्ताधारी नेते प्रक्रिया थांबवल्याचे सांगतात आणि अधिकारी आदेश काढत आहेत. जनतेला फसवण्याचे काम सत्तारुढ नेते करत असून हे फार काळ चालणार नाही. मंगळवारी सकाळी दहा वाजता दसरा चौकातून मोर्चाला सुरुवात होईल. यामध्ये शेतकऱ्यांनी कुटूंबासह यावे. यावेळी, बाजार समितीचे माजी सभापती भारत पाटील-भुयेकर, अतुल दिघे, ‘गोकुळ’चे संचालक प्रकाश पाटील, भगवान काटे, विक्रांत पाटील-किणीकर, शिवाजी मगदूम आदी उपस्थित होते.