मोर्चामुळे साखर सम्राटांना धडकी भरेल
By admin | Published: October 8, 2015 01:03 AM2015-10-08T01:03:23+5:302015-10-08T01:03:37+5:30
बैठकीत शेट्टींचा इशारा : ‘एफआरपी’ची रक्कम एका हप्त्यात मिळावी
हुपरी : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या घामाची, श्रमाची व हक्काची असणारी ‘एफआरपी’ची रक्कम एकाच हप्त्यामध्ये मिळावी, या न्याय्य मागणीसाठी शुक्रवारी (१६ आॅक्टोबर) प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावरती निघणारा मोर्चा इतका भव्य असेल की, हा मोर्चा पाहून राज्यातील साखर सम्राटांना धडकी भरल्याशिवाय राहणार नाही. हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मनापासून कामाला लागावे, असे आवाहन खासदार राजू शेट्टी यांनी केले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या हातकणंगले तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलाविलेल्या बैठकीमध्ये ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शहराध्यक्ष राजाराम देसाई होते. चांदी कारखानदार असोसिएशनच्या हुपरीभूषण य. रा. तथा बापूसाहेब नाईक सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शेट्टी म्हणाले, साखर सम्राटांनी आतापर्यंत शेतकऱ्यांना लुटण्याचा व लुबाडण्याचा उद्योग चालविला आहे. यापुढेही आता ते शेतकऱ्यांच्या हक्काचे असणाऱ्या ‘एफआरपी’चे तुकडे पाडून रक्कम वितरित करण्याचे षड्यंत्र रचित आहेत. ‘एफआरपी’एक रकमी देणे कायद्याने बंधनकारक असतानाही शेतकऱ्यांना अंधारात ठेवून त्यांच्या अपरोक्षच वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आपल्या बगलबच्च्यांकरवी एफआरपी टप्प्याटप्प्याने देण्याचा बेकायदेशीर ठराव करीत आहेत. आपल्या हक्काची ‘एफआरपी’ची रक्कम एकाच हप्त्यामध्ये मिळावी, अशी सर्वच शेतकऱ्यांची मागणी आहे. या मागणीचे सुमारे दीड लाखांपेक्षा जास्त अर्ज संघटनेकडे शेतकऱ्यांनी आतापर्यंत केले आहेत.
येथून पुढेही १६ तारखेपर्यंत जमा होणार आहेत. शेतकऱ्यांचे लाखो अर्ज बैलगाडीतून नेऊन साखर सहसंचालकांना ते देण्यात येणार आहेत. ते म्हणाले, साखर सम्राटांनी सर्वसाधारण सभेत केलेले ठराव शेतकऱ्यांची फसवणूक करून व त्यांना अंधरात ठेवून केल्याचा पर्दापाश शेतकऱ्यांनी संघटनेकडे केलेल्या लाखो अर्जांच्या संख्येवरून स्पष्ट होत आहे.
ज्या साखर कारखान्यांनी गत हंगामातील देणी अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना दिलेली नाहीत, त्यांना वठणीवर आणून रक्कम वसूल केली जाणार आहे. देणी भागविल्याशिवाय कारखान्याचे गाळपच काय धुराडेही पेटू दिले जाणार नाही, अशी चोख व्यवस्था आम्ही करणार आहोत.
यावेळी जिल्हाध्यक्ष भगवान काटे, शिवाजी माने, वैभव कांबळे, रमेश भोजकर, अरुण मगदूम, जयकुमार कोले, सागर चौगुले, राजेंद्र कोल्हापूरे, प्रा. जालिंदर पाटील, संतोष जाधव, आदी पदाधिकारी उपस्थित होते. अशोक बल्लोळे यांनी स्वागत व प्रास्ताविक, तर शहराध्यक्ष राजाराम देसाई यांनी आभार मानले.