मर्दानी खेळाचे प्रशिक्षक सुरज ढोली यांचे हृदयविकाराने निधन, कोल्हापूरकरांमध्ये हळहळ
By संदीप आडनाईक | Published: January 13, 2023 04:05 PM2023-01-13T16:05:17+5:302023-01-13T16:05:46+5:30
कोल्हापूर : कोल्हापुरात शिवपूर्वकालीन युद्धकलेची परंपरा जपणाऱ्या आणि जोपासणाऱ्या तसेच मर्दानी खेळांचा विकास करण्यासाठी झटणाऱ्या आणि लाखो विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या ...
कोल्हापूर : कोल्हापुरात शिवपूर्वकालीन युद्धकलेची परंपरा जपणाऱ्या आणि जोपासणाऱ्या तसेच मर्दानी खेळांचा विकास करण्यासाठी झटणाऱ्या आणि लाखो विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या सुरज विनायक ढोली (वय ४१) यांचे गुरुवारी मध्यरात्री हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.
त्यांच्या निधनामुळे ऐन तारुण्यात अचानक काळाच्या पडद्याआड गेलेला हरहुन्नरी आणि मर्दानी खेळातील रांगडा गडी हरपला. ढोली यांच्या अचानक निधनाने कोल्हापूरकरांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, दोन भाऊ, पुतण्या, चुलते आणि मोठा मित्रपरिवार आहे.
संभाजीनगरचे रहिवासी असलेले सुरज हे मर्दानी खेळासाठी ओळखले जातात. याशिवाय ते कला, रॉक क्लायम्बिंग, रॅपलिंग, माउंटेनिअरिंग, पाेहणे, फुटबॉल, जुन्या शस्त्रांचा आणि नाण्यांचा संग्रह, धनुर्विद्या, तलवारबाजी, रायफल शूटिंग, बुद्धिबळ आणि व्हॉलीबॉल खेळात तरबेज होते. त्यांनी कर्नाटक, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, गुजरात, जम्मू आणि दिल्लीत मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर केली. सूरत ते राजगड पायी प्रवास केला होता.
मालिका, सिनेमासाठी काम
एंटरटेनमेंट के लिए कुछ भी करेगा, शाब्बास इंडिया मालिकेतील ते विजेते आहेत. कॅनडातील आंतरराष्ट्रीय युद्धकला महोत्सवात २१ देशांमध्ये कोल्हापूरच्या शंभूराजे मंचचे सूरज यांनी नेतृत्व केले. मराठीशिवाय बंगाली, मल्याळम, गुजराती, कन्नड, तेलुगू, तमिळ रिॲलिटी शोमध्येही त्यांनी भाग घेतला होता.