मर्दानी खेळातून आत्मिक उन्नती साधावी
By admin | Published: February 15, 2015 11:35 PM2015-02-15T23:35:59+5:302015-02-15T23:47:00+5:30
अमोल कोरगावकर : ‘मर्दानी खेळ, स्पर्धा नियम’ या पुस्तकाचे प्रकाशन
कोल्हापूर : महाराष्ट्राची पारंपरिक युद्धकला म्हणजे मर्दानी खेळ होय. या खेळातून आत्मिक उन्नती साधावी, असे प्रतिपादन उद्योगपती अमोल कोरगावकर यांनी केले. मिरजकर तिकटी येथील सर्वोदय मर्दानी खेळ प्रशिक्षण व सांस्कृतिक सेवा संस्थेतर्फे रविवारी विनय चोपदार यांनी लिखित ‘मर्दानी खेळ, स्पर्धा नियम’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सागर पवार होते.कोरगावकर म्हणाले, कोल्हापुराची ही क्षत्रिय परंपरा टिकविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. तसेच आमच्या ट्रस्टमार्फत आगामी काळात स्पर्धा नियमावर आधारित भव्य मर्दानी खेळ भरविण्यात येतील, असेही आश्वासन त्यांनी दिले. अध्यक्षीय भाषणात पवार म्हणाले, स्पर्धा, नियम पुस्तकाच्या आधारावर राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा भरवावी आणि खेळाला शासकीय दरबारी मान्यता देण्यासाठी ती उपयुक्त ठरणार आहे. याचा लाभ सर्व संघटनांनी घ्यावा.पुस्तकाबद्दल चोपदार म्हणाले, मर्दानी खेळाला या घडीला क्रीडाक्षेत्रात स्थान मिळणे अत्यंत निकडीचे आहे. मर्दानी खेळाला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त व्हावा, खेळामध्ये सुसूत्रता यावी, यासाठी या पुस्तकाचे लिखाण मी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवरायांचे मूर्तिपूजन आणि भवानी तलवारीच्या प्रतिकृतीचे पूजन करण्यात आले. संस्थेतर्फे खेळात विशेष प्रावीण्य मिळविल्याबद्दल आकाश कोरगावकर, संभाजी पाटील, अमृत पाटील, अभिजित लुगडे, कुबेर कट्टीमणी, सुरेश माने, ऋतिका रेडेकर, पल्लवी नागरगोजे, करुणा पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास सुधाकर सुतार, उदय कुंटे, संजय पोवार, शिवानंद स्वामी, संभाजी साळुंखे, महेश उरसाल, मोहन जोंधळे, अजित वरुटे, करण कांबळे, राजू लुगडे, विश्वजित पाटील, सूरज पोळ, योगेश शिंगे, विकास जाधव, संदीप जाधव, अश्विनी गुरव, आदी उपस्थित होते. पाहुण्यांचा परिचय सर्वोदय मर्दानी खेळ प्रशिक्षण व सांस्कृतिक सेवा संस्थेचे संस्थापक लखन जाधव यांनी करून दिला. प्रीती जाधव यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)