ज्येष्ठ मल्लांना दोन दिवसांत मानधन : फरताडे विभागीय संकुलप्रश्नी क्रीडा आयुक्तांना तातडीने पाठविले पत्र
By Admin | Published: May 14, 2014 12:51 AM2014-05-14T00:51:09+5:302014-05-14T00:51:24+5:30
कोल्हापूर : गेल्या तीन वर्षांपासून मानधनाच्या प्रतीक्षेत असलेल्या ज्येष्ठ मल्ल आणि खेळाडूंच्या बँक खात्यांवर दोन दिवसांत या मानधनाची रक्कम जमा होणार आहे.
कोल्हापूर : गेल्या तीन वर्षांपासून मानधनाच्या प्रतीक्षेत असलेल्या ज्येष्ठ मल्ल आणि खेळाडूंच्या बँक खात्यांवर दोन दिवसांत या मानधनाची रक्कम जमा होणार आहे. संबंधितांचे मानधन अदा करण्याबाबतचे लेखी पत्र क्रीडा व युवक संचालनालयाकडून मिळाले आहे. शिवाय विभागीय क्रीडासंकुलाच्या कामातील भाववाढीच्या मुद्द्याबाबत स्पष्टीकरण मिळावे यासाठी क्रीडा आयुक्त पंकजकुमार यांना पत्र पाठविले आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडाधिकारी नवनाथ फरताडे यांनी मंगळवारी (दि. १३) दिली. विभागीय क्रीडासंकुलाचे रखडलेले काम, ज्येष्ठ मल्ल व खेळाडूंचे थकीत मानधन आणि छत्रपती शिवाजी स्टेडियमची दुरवस्था यांवर ‘लोकमत’ने प्रभावीपणे प्रकाशझोत टाकला. त्यावर शिवसेनेने सोमवारी (दि. १२) जिल्हा क्रीडा कार्यालयात आंदोलन केले. ‘लोकमत’ने मांडलेल्या मुद्द्यांची दखल घेऊन क्रीडा कार्यालयाने या मुद्द्यांची सोडवणूक करण्यासाठी हालचाली गतिमान केल्या. याबाबत फरताडे म्हणाले, ज्येष्ठ मल्ल व खेळाडूंच्या गेल्या तीन वर्षांपासून थकीत असलेल्या मानधनाबाबत पुण्यातील क्रीडा व युवक संचालनालयाशी पत्रव्यवहार केला. त्याबाबतच्या कार्यवाहीचे पत्र सोमवारी (दि. १२) मिळाले आहे. यात कोल्हापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ मल्ल व खेळाडू अशा १७ जणांचे आतापर्यंतचे एकूण १६ लाख ५७ हजार ५०० रुपये इतके मानधन अदा होणार आहे. दोन दिवसांत ते संबंधित मल्ल आणि खेळाडूंच्या बँक खात्यावर जमा होणार असल्याचे क्रीडा संचालनालयाचे लेखाधिकार्यांनी कळविले आहे. विभागीय क्रीडासंकुलाचे बांधकाम सध्या ‘भाववाढी’च्या मुद्द्यावर अडले आहे. संकुलाच्या कामाची निविदा काढली. त्यावेळी यात भाववाढीच्या मुद्द्याची नोंद नव्हती. मात्र, गेल्या महिन्यात मंजूर केलेल्या सुधारित अंदाजपत्रकात भाववाढ देऊ नये, अशी नोंद केली आहे. त्यावर मार्गदर्शन मिळावे यासाठी क्रीडा आयुक्त पंकजकुमार यांना २८ एप्रिल २०१४ रोजी पत्र पाठविले आहे. त्यांनी याबाबत दोन ते तीन दिवसांत निर्णय देण्यात येईल, असे कळविले आहे. भाववाढीच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण मिळाल्यानंतर संकुलाच्या कामकाजाबाबतची पुढील कार्यवाही केली जाईल. (प्रतिनिधी)