मार्गशीष महिना, लग्नसराईमुळे फुलांच्या मागणीत वाढ, झेंडूला मिळतोय शेवंतीचा भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2021 11:53 AM2021-12-20T11:53:02+5:302021-12-20T11:53:23+5:30
मार्गशीर्ष महिना व लग्नसराई असल्याने मागणीमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे ‘झेंडू’, ‘शेवंती’, ‘निशिगंधा’, ‘गुलाब’, ‘अष्टर’ या फुलांना चांगलीच तेजी आली आहे.
राजाराम लोंढे
कोल्हापूर : अवकाळी पावसाने फुलांच्या बागांचे नुकसान झाल्याने मंदावलेली आवक, त्यात मार्गशीष महिना व लग्नसराईमुळे मागणी झालेली वाढ, यामुळे सध्ये झेंडू तेजीत आहे. किरकोळ बाजारात भगवा झेंडू २०० रुपयांपर्यंत पोहोचला असून, ‘शेवंता’चा भाव झेंडूला मिळत आहे.
मध्यंतरी पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाने आठ-दहा दिवस झोडपून काढले. यामध्ये भाजीपाल्यासह फुलांचे मोठे नुकसान झाले. सततच्या पावसाने फुलांची काढणी करता आली नाही. फुले कुजून गेली. फुलझाडाच्या मुळाशी पाणी साचल्याने उत्पादन कमी झाले आहे.
त्यात मार्गशीर्ष महिना व लग्नसराई असल्याने मागणीमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे ‘झेंडू’, ‘शेवंती’, ‘निशिगंधा’, ‘गुलाब’, ‘अष्टर’ या फुलांना चांगलीच तेजी आली आहे. ‘शेवंती’पेक्षा भगवा झेंडूच भाव खाऊ लागला आहे.
भगवा झेंडू दोनशे रुपयांवर
एरव्ही झेंडू महागला तरी ८० ते १०० रुपये किलोपर्यंत असायचा. मात्र, सध्या किरकोळ बाजारात पिवळा झेंडू १४०, तर भगवा झेंडू २०० रुपये किलोपर्यंत आहे.
मार्गशीष पूजेसाठी झेंडू
मार्गशीषमधील पूजा, लग्नातील सजावटीसाठी शेवंती व झेंडूची मागणी अधिक आहे. कोरोनाचे निर्बंध कमी झाल्याने लग्न समारंभ थाटात होऊ लागले आहेत. त्याचा परिणामही फुलांच्या दरवाढीवर झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
दोन महिने तेजी कायम राहणार
पावसाने बागा उद्ध्वस्त झाल्या, त्यात सध्या थंडी वाढल्याने कळ्या उमळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. नवीन बागेतून आवक होऊन बाजार स्थिरस्थावर होण्यास किमान दोन महिन्यांचा कालावधी लागेल.
असे आहेत फुलांचे दर, किलोमध्ये-
पिवळा झेंडू- १४० ते १६० रुपये
भगवा झेंडू- १८० ते २०० रुपये
शेवंती -१२० ते १४० रुपये
निशिगंधा - २०० रुपये
चिनी गुलाब - २८० ते ३२० रुपये
गुलाब - ४० रुपये पेंढी (दहा फुले)
अष्टर - २४० रुपये
अवकाळी पावसामुळे फुलांचे उत्पादन एकदम कमी झाले आहे. त्यात मागणी वाढल्याने दर थोडे तेजीत आहेत. भगव्या झेंडूला चांगला दर असून, त्याची आवक थोडी कमी आहे.-सर्जेराव माळी (फूल विक्रेते)