झेंडूची शेती बनली किफायतशीर
By admin | Published: October 26, 2014 09:56 PM2014-10-26T21:56:10+5:302014-10-26T23:24:22+5:30
शेतकऱ्यांची दिवाळी : करवीर तालुक्यात फूलशेतीतून मोठी उलाढाल
शिवराज लोंढे- सावरवाडी -दसरा-दिवाळी सणांमध्ये झेंडू फुलांना वाढती मागणी असते. कमी वेळेत जादा आर्थिक नफा देणाऱ्या झेंडू फुलशेतीकडे शेतकऱ्यांचा दिवसेंदिवस कल वाढत आहे. करवीर तालुक्याच्या पश्चिम भागात दिवाळी सणात झेंडू फुलशेतीतून मोठी आर्थिक उलाढाल झाली. झेंडू फुलांना बाजारपेठेत मागणी वाढल्याने यावर्षी झेंडू पिकविणाऱ्या शेतकऱ्यांची दिवाळी खुशीत गेली.
प्रामुख्याने गेल्या चार-पाच वर्षांत करवीर तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकरी झेंडू फूलशेतीकडे वळले आहेत. ऊसपिकाला पर्याय म्हणून आणि कमी कालावधीत जादा आर्थिक नफा देणारी झेंडू फूलशेती शेतकऱ्यांना परवडत आहे. झेंडू फुलांना गणेशोत्सव, दसरा, दिवाळी या सणांमध्ये जादा मागणी असते.
ग्रामीण भागात केसरी व पिवळ्या रंगांच्या झेंडू फुलांचे उत्पादन घेतले जाते. बाजारपेठेत झेंडू फुलास सरासरी ५० रुपये ते १२० रुपये प्रतिकिलो दर मिळतो. जादा उत्पादन झाले की, दरात घसरण होते.
विधानसभेच्या निवडणुकीत विविध प्रकारचे हार तयार करून त्यांची विक्रीही उत्तम प्रकारे झाली. दिवाळी-दसरा सणांमध्ये ग्रामदैवतांच्या मंदिरात सडा घालण्यासाठी झेंडू फुलांना मागणी असते. नव्या बदलाच्या युगात झेंडू फुलांना बाजारपेठेत वाढती मागणी असून, झेंडू फूल पीक हे आंतरपीक म्हणून शेतकरी घेऊ लागला आहे. ऊसपिकात अंतर्गत फूलशेतीचा वापर होत आहे. चार महिन्यांच्या कालावधीत दुप्पट नफा देणाऱ्या झेंडू फूलशेतीची शिवारे रंगाच्या उधळणीनं निसर्गरम्य दिसत आहेत.
करवीर तालुक्यात गणेशवाडी, सावरवाडी, शिरोली दुमाला, बहिरेश्वर, म्हारूळ, कोगे, बाचणी, सडोली दुमाला, आदी भागांत झेंडू फूलशेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. दर्जेदार आणि फुलदार झेंडू पिकांचे उत्पादन घेतले जात आहे. पुणे, गोवा, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, मुंबई, आदी ठिकाणांच्या बाजारपेठेत करवीर तालुक्याच्या पश्चिम भागातून झेंडू फुलांची निर्यात होत असते. झेंडू फुलांची व्यापारीमंडळींकडून गावात अथवा शेतीच्या बांधावर रोख पैसे देऊन खरेदी केली जाते.